शेतातील काडीकचरा पेटून देणे, शेत स्वच्छ करणे ही कामे सुरू आहेत. वन विभागाने शेतकऱ्याचे शेताचे बांधावर, शासकीय जमिनीवर माळरानावर, रस्त्याच्या बाजूला पावसाळ्यात लाखो रुपये खर्च करून वृक्षरोपण केलेले आहे. वृक्ष संवर्धन, पाणी व्यवस्था यासाठीसुद्धा मोठा खर्च केलेला आहे. याशिवाय पडीत जमिनीवर व माळरानावर लहान-मोठी अनेक झाडे आहेत. झाडाची पानगळ होऊन काही झाडे वाळलेली आहेत. शेतकरी पेरणीपूर्व मशागतीचा एक भाग म्हणून पालापाचोळा कचरा पेटवून देतात चोहीकडे पसरलेला पालापाचोळा पेटल्याने त्यात कधीकधी लहान मोठी झाडे होरपळून जातात. अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती बाभूळ, कडूनिंब, पळस, बेहडा इतर नव्याने उगवलेले तीन-चार फुटापर्यंत वाढलेली झाडे जळून नष्ट होत आहेत. बुंध्याशी वाळलेला भाग जळाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेली लहान झाडे जळून खाली पडतात. आजूबाजूची मंडळी त्याची तोड करण्याचे प्रकार वाढले आहे. वन विभाग माळरानावर झाडे लावून पाच सहा वर्ष नीगा राखून वाऱ्यावर सोडलेली असते. त्याची तोड होऊन परिसर उजाड बनत आहे.
वृक्षतोड थांबविण्याची गरज
वाढत्या वृक्षतोडीमुळे त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. पर्यावरण संतुलन राखण्याकरिता वृक्षतोड थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
एकीकडे लाखो रुपये खर्च करून शासन दरवर्षी वृक्षरोपण वृक्ष संवर्धन करते. त्यापेक्षा आपोआप उगवलेली निसर्गनिर्मित झाडे वाचवली तर खूप खर्च वाचू शकतो.