मेहकर: शहरसह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील दोन्ही कोविड केअर सेंटरमध्ये राहत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना योग्य सुविधा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. येथील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची गैरसोय होत आहे. येथे स्वच्छता नाही, पिण्याचे पाणीही मिळत नाही. कोरोना अहवालास विलंब लागत असून, कोविड सेंटरमध्ये समस्यांचे ग्रहण लागले आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील डोणगाव रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या वसतिगृह व संताजी नगर येथील मुलींचे वसतिगृह असे दोन ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केलेले आहे. डोणगाव रस्त्यावरील कोविड सेंटरमध्ये ८५ रुग्ण व संताजी नगर सेंटरमध्ये २२ असे एकूण १०७ रुग्ण आहेत. दररोज ५०० च्या वर दुकानदार, कर्मचारी आदींची आरटीपीसी चाचणी करण्यात येत आहे. मात्र या कामासाठी अपुरे मनुष्यबळ असून तात्काळ या ठिकाणी सात ते आठ डॉक्टर देणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणावर चाचणी करण्यात येत असल्याने चार चार दिवस उलटून गेल्यावरही चाचणी अहवाल मिळत नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. कोविड सेंटरमध्ये भर्ती असलेल्या रुग्णांना पिण्याचे पाण्याची सुविधा नसल्याने वेळेवर जेवण करता येत नाही. पिण्याचे व वापरण्यासाठी लागणारे पाणी दोन ते तीन दिवस येत नाही. या कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी असलेले बेडवरील गादी खराब झालेली आहे. ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी नसल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरलेली आहे. काही ठिकाणी रुग्णांना देण्यात येणारे कीट वापरून पडलेले साहित्य उचलण्यात न आल्यामुळे नवीन आजार होण्याची भीती निर्माण झालेली आहे. या ठिकाणी सॅनिटायझरची काहीच व्यवस्था नाही.
कोट....
दोन्ही कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांसाठी होत असलेल्या समस्यांची चौकशी करण्यात येईल. यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल.
संजय गरकळ, तहसीलदार मेहकर.