सुपरस्प्रेडरच्या चाचण्या सध्या जिल्ह्यात सर्वत्र होत आहे. त्यानुषंगाने लोणारमध्येही या चाचण्या घेण्यात आल्या. चाचण्या न केल्यास संबंधितांवर कारवाईचा बडगाही उगारण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. त्यानुषंगाने मोठ्या प्रमाणावर या कोरोना चाचणीस स्थानिक व्यापारी, दुकानादारांनी प्रतिसाद दिला होता. आरटीपीसीआर चाचण्यांसाठी त्यामुळे येते ५०० च्या आसपास नमुने जमा झाले होते. मात्र प्रत्यक्षात प्रयोगशाळेत तपासणीसाठी हे नमुने पाठवितांना मात्र विलंब होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तपासणीचा नेमका अहवाल काय आला याची व्यापाऱ्यांना प्रतीक्षा लागून राहली असून अनेकांना धाकधूक निर्माण झाली आहे.
आरटीपीसीआरसाठी घेण्यात आलेले बहुतांश नमुने हे लोणार येथेच पडून आहेत. डाटा एंट्रीच्या अडचणीमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे अहवाल येण्यास विलंब होत आहे. यंत्रणेत आपसी समन्वय नसल्याने हा प्रकार घडत असल्याची ओरड आहे. मुळात ज्या पोर्टलवर ही नावे द्यावी लागतात त्यावर एका आयडीवरून १०० जणांचीच नावे अपलोड होत आहे. लोणारात आरोग्य विभागास एकच आयडी देण्यात आल्याने ही समस्या निर्माण होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
डाटा एंट्रीचे काम सुरळीत सुरू आहे. परंतु चाचण्याची संख्या खूप जास्त वाढल्यामुळे पाठविण्यात आलेल्या नमुन्यांचे रिझल्ट यावयास वेळ लागत आहे.
डॉ. भास्कर मापारी, व्यवस्थापक, कोविड सेंटर, लोणार
पोर्टलवर तपासणीसाठी घेण्यात आलेल्यांची नावे टाकण्यासाठी देण्यात आलेल्या आयडीद्वारे केवळ १०० व्यक्तींचीच माहिती अपलोड होत आहे. त्यामुळे तीन आयडी तपासणीची आकडेवारी वाढली असल्याने अजून दोन ते तीन आयडी रजिस्ट्रेशन करण्यास कळविण्यात आले आहे. ही अडचण येत्या काही दिवसात मार्गी लागेल.
डाॅ. के.व्ही. राठोड, तालुका आरोग्य अधिकारी, लोणार.
बाॅक्स
चाचणी केल्यानंतर रिपोर्टअभावी नगर परिषदेने अद्याप एकाही दुकानदारावर कारवाई केलिली नाही. चाचणीसाठी नमुना दिल्यानंतर रिपोर्ट येण्यास कमीतकमी ३ दिवसांचा कालावधी लागतो. याची कल्पना असल्यामुळे फक्त नियम तोडणाऱ्या व्यक्तींवरच कारवाई केली जात असल्याची प्रशासनाच्या सूत्रांकडून माहिती मिळत आहे.