पिंपळगावसराई (जि. बुलडाणा) : येथील महाजल योजनेच्या कामात कंत्राटदार जे.बी.राजपूत हे दिरंगाई करीत असून, २00८ पासून सुरु झालेले काम अद्यापही पूर्ण झाले नाही. काम एका महिन्याच्या आत पूर्ण न केल्यास महाजल योजनेच्या टाकीवर उपोषणास बसण्याचा इशारा महाजल समितीचे अध्यक्ष फकीरा तरमळे यांनी २५ जानेवारी रोजी दिला. त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, महाजल योजनेसाठी काम १ कोटी ५७ लाख रुपये मंजूर झाले होते. अद्याप काम पूर्ण न झाल्यामुळे गावकर्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. योजना मंजूर झाल्यापासून कंत्राटदाराने कामाची पाहणी केलेली नाही. योजनेंतर्गत दोन विहिरी खोदलेल्या आहेत; परंतु त्या विहिरींना पुरेसा पाणीसाठा नाही., तसेच पिंपळगावसराई व सैलानी येथे दोन पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत. प्रत्येक ग्रामसभेत गावकरी महाजल योजनेच्या कामाविषयी चर्चा करतात. वेळोवेळी ठरावही दिला जातो, तरीही संबंधित अधिकारी विषयाचे गांभीर्य लक्षात घेत नाहीत. पाण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असताना गावकरी तहानलेलेच आहेत. अपुर्या कामामुळे योजना रखडली आहे. आपण व समितीच्या सचिव किरण गवते यांनी वारंवार कंत्राटदारांना भेटून काम पूर्ण करण्याची सूचना केल्या; परंतु त्यांनी अद्याप काम सुरू केले नसल्याने नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावातील काही भागात पाइपलाइन टाकली. अद्याप ५0 टक्के पाइपलाइनचे काम बाकी आहे. मार्च महिन्यात सैलानी बाबांची यात्रा आह.े. तेव्हा प्रशासनाने या कामाची पाहणी करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी फकीरा तरमळे यांनी केली आहे. यासंदर्भात कंत्राटदाराशी संपर्क केला असता, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
महाजल योजनेच्या कामात दिरंगाई
By admin | Published: January 28, 2016 11:21 PM