खामगाव: स्थानिक बसस्थानकावरून ग्रामीण भागातील बसेस नियमित सोडल्या जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड आणि मनस्ताप सहन करावा लागते. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी खामगाव बस स्थानक ते आगारापर्यंत पायदळ मोर्चा काढला. आपल्या संतप्त भावनांचे आगार प्रमुखांना निवेदन सादर केले.
याबाबत सविस्तर असे की, अपुऱ्या बसेसमुळे गत काही दिवसांपासूनखामगाव आगरातील एसटी बसचे नियोजन कोलमडले आहे. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसह सामान्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, मंगळवारी खामगाव स्थानकातून खामगाव ते नागापूर मार्गे किन्ही महादेव, आणि आवार ते विहीगाव करीता बस वेळेवर सोडण्यासाठी विद्यार्थ्यी संतप्त झाले होते. शाळा सुटल्यानंतर बराच वेळ बस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला.
त्याचवेळी अहिल्यादेवी होळकर विद्यालयातील मुख्याध्यापक संजय कोकरे यांनी आगार प्रमुखांना मंगळवारी निळेगाव, विहिगाव, किन्ही महादेव, नागापूर अशा वेगवेगळ्या गावातील ५६ विद्यार्थी सकाळी १०:३० वाजेपर्यंत शाळेत पोहोचतील. आणि सायंकाळी ४:४५ वाजता सर्व बसेस विहिगाव येथे पोहोचतील. शनिवारी सकाळी ७:३० तर शाळा सुटल्यानंतर ११ वाजता विहिगाव येथे पोहोचतील अशा सोयीने व्यवस्था करण्याची मागणी निवेदनातून केली. त्याचवेळी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी किन्ही महादेव ते नागापूर, विहिगाव पर्यंत बसेस सुरू करावी अशी मागणीही यावेळी विद्यार्थ्यांनी केली. माजी सभापती सुरेश तोमर यांनी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठींबा दिला. आगार व्यवस्थापकांच्यावतीने सहा. वाहतूक निरिक्षक सरला तिजारे यांनी विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारले. विद्यार्थ्यांच्या समस्या तत्काळ निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
पायी पोहोचले विद्यार्थी
मंगळवारी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी बस उपलब्ध नव्हती. त्यामुळे अनेक विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहोचू शकले नाही. संतप्त विद्यार्थ्यांनी बसस्थानक ते आगारापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चाद्वारे निवेदन सादर केले.