अहवालास विलंबाने वाढताेय काेराेना
धाड : चाचण्या वाढविण्यात आल्याने काेराेना अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे धाड परिसरात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. अनेक जण गावात फिरल्यानंतर त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह येत आहे. त्यामुळे अशा रुग्णांना प्रतिबंध घालण्याची गरज आहे़
गाैणखनिजाची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करा
मेहकर : तालुक्यात व ग्रामीण भागातील रस्त्यावर विनापरवाना रेतीची मोठ्या गाड्यांतून वाहतूक होत असून, यामुळे रस्त्याचे नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे शासनाचा महसूल बुडतोय. यामुळे या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राकाॅचे उपाध्यक्ष गिरीधर ठाकरे पाटील यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
राहेरी बु परिसरात ग्रामस्थांची सरपणाकडे धाव
राहेरी बु : स्वयंपाकाच्या गॅसची किंमत सतत वाढत आहे. महिनाभरात घरगुती सिलिंडरची किंमत ७२० रुपयांनी वाढून ८७० रुपयांवर पोहोचली असताना सबसिडी मात्र केवळ दाेन रुपये एवढीच दिली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना सिलिंडर परवडत नसल्याने ते सरपणासाठी जंगलाकडे धाव घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
साखळी-अंत्री तेली शेतरस्त्याचे काम मार्गी
बुलडाणा : साखळी ते अंत्री तेली शेतरस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या भागात शेती असलेले शेतकरी त्रस्त झाले आहेत. या शेतरस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली हाेती.
उगले पांग्री रस्त्याची दुरुस्ती करा
किनगाव राजा : येथील महात्मा फुलेनगराकडे जाणाऱ्या उगले पांग्री रस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर माेठमाेठे खड्डे पडल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
ज्येष्ठांनी लस घेण्यासाठी पुढे यावे
बुलडाणा : कोरोना प्रतिबंधासाठी समाजात सामूहिक प्रतिकारशक्ती विकसित होण्यास लसीकरण परिणामकारक ठरणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी स्वत: पुढे येऊन लसीकरण करावे व राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन आराेग्य विभागाने केले आहे.
रस्त्यावरील धुळीमुळे पिकांना फटका
दुसरबीड : तढेगाव फाटा ते देऊळगावमही रोडवरील समृद्धी महामार्गाच्या कामासाठी जाणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यालगतच्या शेतांना धुळीचा फटका बसत आहे. त्यामुळे तूर पिकाचे नुकसान होत आहे.
आठवडी बाजार बंद; व्यापारी संकटात
बुलडाणा : काेराेना संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात भरणारे आठवडी बाजार बंद केले आहेत. त्यामुळे छाेटे व्यावसायिक संकटात सापडले आहेत. नियमांचे पालन करून बाजारास परवानगी देण्याची गरज आहे.
गाेपालनातून शेतकऱ्याने साधली प्रगती
किनगाव जट्टू : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीला लागलेला खर्च वसूल होत नसल्याने, शेतीला जोडधंदा सुरू करून भुमराळा येथील शेतकरी लक्ष्मण टेकाळे यांनी गायी पालनातून आर्थिक प्रगती साधली आहे. केवळ दूध विक्रीच नव्हे, तर दुधापासून होणाऱ्या पदार्थांची विक्री केली.