कोरोना संसर्गाची वाढती व्याप्ती पाहता अमडापूर परिसरातील आरोग्य कर्मचाऱ्यांवर मोठा ताण आला आहे. त्यासंदर्भाने सोमवारी या कर्मचाऱ्यांनी हे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनास दिले आहे. यात प्रामुख्याने दर महिन्याच्या १ तारखेला वेतन दिले जावे. कमी मनुष्यबळात सध्या आरोग्य विभाग काम करत आहे. त्यामुळे तारेवरची कसरत होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य संवर्धन होणे गरजेेचे आहे. त्यासाठी कामकाजाच्या ठिकाणी दर्जेदार सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा व जेवण उपलब्ध केले जावे. एनएचएम कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कोविड सेंटरवर नव्याने काही कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी. त्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात येऊ नये. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी एनएचएमअंतर्गत स्टाफ नर्स आणि अन्य पदे तत्काळ भरण्यात यावी. ज्या लसीकरण केंद्रावर कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, तेथे रोजंदारीवर एनएमची नियुक्ती केली जावी. कोविड लसीकरण केंद्रावर आयडी व्हेरिफिकेशन व तत्सम कामासाठी पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जावी. लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांना दोन वेळ नाश्ता व दुपारचे जेवण आणि पाण्याची व्यवस्था केली जावी. याव्यतिरिक्त लसीकरण केंद्रावर वाढती गर्दी पाहता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल लोकंडे व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांनी हे निवेदन १५ मार्च रोजी दिले आहे.
कोविड प्रतिबंधाच्या कामात सुसूत्रता आणण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 4:33 AM