किनगावराजा : येथील सिंदखेडाराजा ते मेहकर मार्गाच्या दाेन्ही बाजूने भराव टाकण्याची मागणी हाेत आहे़ ७० किलोमीटर अंतरच्या रस्त्यावर महामार्गाच्या दाेन्ही बाजू खाेलगट झाल्या आहेत़ त्यामुळे, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे़ सिंदखेडाराजा ते मेहकर महामार्गावर किनगावराजा येथून मुंबई ते नागपूर जाण्यासाठी अतिशय जवळचा मार्ग आहे़ या मार्गावरून दररोज शेकडो वाहने धावतात़ अलीकडील काळात दोन महिन्यापूर्वी डांबरीकरण करून रस्ता नूतनीकरणाचे काम संबंधित विभागाने केले आहे़ परंतु रस्त्याची उंची बऱ्याच ठिकाणी जास्त झाल्यामुळे, तसेच दोन्ही बाजूने मुरमाचा भराव टाकण्यात आला नाही़ त्यामुळे छोटे वाहनधारक, तसेच दुचाकीचालक त्रस्त झाले आहे़ वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने अपघात घडत आहेत़ किनगावराजा येथे बाजारपेठ, बँका, तसेच अनेक शासकीय कार्यालये आहेत़ त्यामुळे परिसरातील अनेक गावांचा येथे कामानिमित्त सतत संपर्क येतो़ त्यामुळे येथे नेहमी वाहनांची वर्दळ असते़ या रस्त्याच्या दाेन्ही बाजूने भराव टाकण्याची मागणी हाेत आहे़
महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष
हा महामार्ग ८ नोव्हेंबर २०१९ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे हस्तांतरित केला आहे़ संबंधित प्राधिकरण विभागीय अभियंता कसबे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; पण ते उपलब्ध होऊ शकले नाही़ त्यांचा फोन नॉट रिचेबल येत होता.
काेट
गंभीर अपघाताची शक्यता असल्याने महामार्गाच्या दोन्हीही बाजूने भराव टाकण्याची आवश्यकता आहे़ संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन दाेन्ही बाजूने भराव टाकण्याची गरज आहे़
विनोद वाघ, प्रदेश प्रवक्ते भाजप