गत दीड वर्षापासून कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने शासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी, कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. निर्बंधांमुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचा माल कवडीमोल भावात विकावा लागला. शेतकऱ्यांनी अडचणीत पेरणी उरकली. परंतु सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने दुबार, तिबार पेरणी करावी लागली. या सर्व परिस्थितीचा सामना करून पीक बहरात आले असता निसर्गाच्या अवकृपेने अतिवृष्टी झाल्याने मूग, उडीद या पिकाचे अतोनात नुकसान झाले. यासंदर्भात शासनाच्या वतीने या
पिकाचे सर्वेक्षण करण्यात आले. सोयाबीनच्या झाडावरच शेंगांना कोंब फुटल्याने पिकाची
नासाडी झाली. काही गावातील शेतकऱ्यांना तूटपुंजी मदत मिळाली तर काही भागात अधिकाऱ्यांनी पिकाचे नुकसान होऊनसुद्धा चुकीचा अहवाल दिल्यामुळे मदतच मिळाली नाही. पीकविम्याचा लाभही शेतकऱ्यांना मिळाला नाही. नापिकीमुळे बँकेचे काढलेले कर्ज शेतकरी भरू शकले नाहीत. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना बँका कर्ज वाटप करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, यावर्षी पेरणी कशी करावी, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमाेर पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे गतवर्षीचे असलेले बँकेचे कर्जाचे पुनर्गठन करून नव्याने यावर्षी पीक कर्जवाटप करण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार लोणार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.