लोकमत न्यूज नेटवर्कहिवराआश्रम : स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करीत असल्यामुळे संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांच्याकरवी माझ्या जिवीत्वास धोका असल्याने मला आत्मदहन करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी हिवरा बु.येथील गजानन काशिनाथ पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.गजानन पवार यांनी आत्मदहनाची परवानगी मागण्यासाठी जो पत्रव्यवहार केला आहे, त्यात असे म्हटले आहे की, येथील ग्रामपंचायत कार्यालयात सन २०१० ते २०१६ पर्यंत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. याबाबत पंचायत समिती मेहकर येथे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र संबंधीत विस्तार अधिकारी हे चौकशी न करता उडवाउडवीची उत्तरे देवून भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. शिवाय तक्रारी करु नकोस अन्यथा तुला जिवंत ठेवणार नाही, अशा धमक्या अधिकारी व पदाधिकारी देत आहेत. सन २०१२-१३ मध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारी केल्या होत्या. त्यावेळेस मला ग्रामपंचायत शिपायाकडून मारहाण केली होती. त्यामुळे या संबंधीत अधिकारी व पदाधिकारी यांच्यापासून माझ्या जिवीत्वास धोका आहे. त्यामुळे मला आत्मदहन करण्याची परवानगी देण्यात यावी. गजानन पवार यांच्या तक्रारीनुसार चौकशी करण्यात आली असून, त्यानुसार कार्यवाही सुद्धा करण्यात आली आहे. गजानन पवार यांच्याशी वैयक्तीक कुठलाही संबंध नसल्याने धमक्या देण्याचा प्रश्नच येत नाही.- शिवाजी गवई, विस्तार अधिकारी, पं.स.मेहकर.
आत्मदहनासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागितली परवानगी!
By admin | Published: July 06, 2017 12:29 AM