माेताळा शहरात घाणीचे साम्राज्य
माेताळा : शहरात एक-एक महिना नाल्यांची साफसफाई होत नाही. त्यामुळे नाल्यांमध्ये घाण साचलेली आहे. परिणामी सर्वत्र दुर्गंधी पसरली असून, शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या दुर्गंधीयुक्त घाणीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
नुकसानग्रस्तांना वनविभागाकडून चार लाखांची मदत
बुलडाणा : वन्यप्राण्यांकडून पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेते. गत दाेन ते तीन वर्षांत पिकांच्या झालेल्या नुकसानीपाेटी शेतकऱ्यांना १ लाख ५१ हजार, तर पाळीव प्राण्यांच्या झालेल्या हानी प्रकरणी २ लाख ९० हजार रुपयांची भरपाई दिली आहे.
अवैध धंद्यांविरुद्ध पाेलिसांची कारवाई
अंढेरा : मागील काही दिवसापासून शहरासह परिसरात सुुरू असलेल्या अवैध धंद्याविरुद्ध स्थानिक पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी छापा टाकून अवैध गुटखा व गावठी दारूचे अड्डे नष्ट केले आहेत.
रिझवींचा पुतळा जाळून केला निषेध
धामणगाव बढे : वसीम रिजवीं यांनी धर्मग्रंथ पवित्र कुराण यातील २६ वी आयात हटविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मागणी केली. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्यामुळे वसीम रिझवींचा धामणगाव बढे येथे पुतळा जाळण्यात आला.
नामशेष हाेत असलेल्या पक्षांचे संवर्धन करा
माेताळा : मागील काही वर्षांपासून निसर्गाचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या चिमण्या नामशेष होत चालल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. त्यामुळे नामशेष होत चाललेल्या पक्ष्यांचे सर्वांनी संवर्धन करावे, असे आवाहन मोताळा वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
४२ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई
लाेणार : काेराेना संसर्गाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. परंतु, या बंदी आदेशाला झुगारून अनेक वाहनधारक बिनधास्तपणे फिरत आहेत. त्यामुळे अशा बेफिकीर वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत ४२ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
लसीकरणाला इंटरनेटचा खाेडा
धाड : रायपूर येथील लसीकरण मोहीम वेगात सुरू झाली असतानाच आता मोबाईल इंटरनेट व्यवस्थित चालत नसल्याने नोंदणी ठप्प झाली आहे. या भागात इंटरनेट सुविधा सुरळीत चालत नाही. आरोग्य कर्मचारी मोबाईलद्वारे लसीकरणाची नोंद घेत आहेत. परंतु, इंटरनेट सेवा मंद गतीने चालत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
नुकसानाचे तातडीने पंचनामे करा
बुलडाणा : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या वादळी पावसासह गारपिटीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल शासनास सादर करावा, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
चाैकात झळकवली थकबाकीदारांची नावे
लाेणार : येथील पालिका प्रशासनाने शहरातील मालमत्ता थकबाकीदार, तसेच पाणीपट्टी कर थकबाकीदार यांच्या नावाचे फलक शहरातील चौकाचौकात लावले आहेत. विशेष म्हणजे या यादीत शहरातील कोणत्या व्हीआयपी थकबाकीदारांची नावे यादीत झळकली, हे पाहण्यासाठी नागरिक एकच गर्दी करीत आहेत.
ज्ञानगंगा अभयारण्यात वनविभागाच्या वतीने स्वच्छता अभियान
बुलडाणा : जंगल झपाट्याने कमी झाले तर त्याचे दृश्य परिणाम गंभीर हाेतील. निसर्गसंपदेने समृद्ध ज्ञानगंगा अभयारण्याचे व त्यातील वन्यजीवांचे संरक्षण करण्यासंदर्भात बुलडाणा, खामगाव वनपरिक्षेत्र विभागाने २१ मार्च राेजी स्वच्छता अभियान व पक्ष्यांचे पुस्तके व माहितीपत्रके वितरित केली.