लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : शेतकऱ्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत अवास्तव मागणी करणाऱ्या दाताळा येथील सेंट्रल बँक मॅनेजरच्या बडतर्फीची मागणी धानोरा येथील शेतकऱ्यांनी सदर बँक मॅनेजरचा पुतळा सोमवारी जाळला.दाताळा येथील सेंट्रल बँकेचा मॅनेजर दिवसे याने शेतकऱ्यास पीक कर्ज देण्याच्या मोबदल्यात त्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. सदर महिलेच्या तक्रारीवरुन मलकापूर ग्रामीण पो.स्टे.मध्ये गुन्हा दाखल असून मॅनेजरचा सहकारी शिपायास अटक करण्यात आली आहे. मॅनेजर अद्यापही फरार आहे. बँक मॅनेजरच्या केलेल्या या निंदनीय घटनेचा निषेध राज्यभरात विविध स्तरातून होत असून सोमवारी धानोरा वि. येथे परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत बँक मॅनेजर दिवसे व शिपाई चव्हाण यांना नोकरीतून बडतर्फ करण्याची मागणी केली. व मॅनेजरच्या पुतळ्याचे दहन केले. तसेच शेतकऱ्यांच्या मजबुरीचा गैरफायदा घेणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यांची यापुढे शासनाने गय करु नये व शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांना कठोर शासन करावे अशी मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. सदर निवेदनावर गुलाबराव पाटील, सोपान चोपडे, कैलास पाटील, राजू राखोंडे, रमेश अढाव, सुभाष कोल्हे, दिपक सरोदे, परमेश्वर ठाकरे, संदीप नाफडे, गजानन रास, समाधान वानखडे, मोहन बोंडे, भाऊराव पाटील, भावेश गावंडे, विनायक उंबरकर, एकनाथ चोपडे, विशाल जंगले, महादेव वानखडे यांच्यासह बहुसंख्य शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलीस निरिक्षकांना निवेदन
मलकापूर : मलकापूर तालुक्यात पिक कर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी करण्याच्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने पक्षनेते संतोषराव रायपुरे यांच्या नेतृत्वात पोलीस निरिक्षकांना निवेदन सादर करण्यात आले. घडलेल्या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेतील आरोपींवर कडक कारवाई करावी तसेच त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली. पोलीस निरिक्षक बि.आर.गावंडे यांना देण्यात आलेल्या निवेदनावर संतोषराव रायपुरे, तालुकाध्यक्ष माधवराव गायकवाड, शहराध्यक्ष शाहीद शेख, पं.स.सदस्य सुरेश पाटील, पुरुषोत्तम रायपुरे, बबनराव तायडे, संदीप गायकवाड, सुखदेव चांदेलकर आदींच्या स्वाक्षरी आहेत.