लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : गेल्या २४ तासात राज्यभरात चर्चेचा व आस्थेचा विषय ठरलेल्या मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक शाखाधिकारी याचं पिककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी करणारे प्रकरण गाजत आहे. यात संबंधित शाखाधिकारी व त्याला मदत करणाऱ्या शिपायाविरूध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले. त्याप्रकरणी पोलिसांचे दोन पथके आरोपींच्या शोधार्थ रवाना झाल्याची माहिती तपास अधिकारी तथा डिवायएसपी गिरीष बोबडे यांनी शनिवारी दिली.
तालुक्यातील मौजे उमाळी येथील शेतकरी सपत्नीक पिककर्जासाठी गुरूवारी दाताळा येथील सेंट्रल बँकेत गेला असता शाखाधिकारी राजेश हिवसे यांनी मोबाईल नंबर घेवून शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली. या प्रकाराची चौकशी करून ग्रामीण पोलीस निरीक्षक बी.आर. गावंडे यांनी शाखाधिकारी व त्याला मदत करणारा शिपाई मनोज चव्हाण याच्याविरूध्द महिलेच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.
शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आदी पक्षांनी निवेदने सादर केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तर दाताळ्यात गदारोळ माजविला. सेंट्रल बँकेच्या कार्यालयास काळे फासले. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोधर शर्मा यांनी या आंदोलनाला पाठींबा दिल्याने शनिवारी मलकापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, याप्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी गिरीष बोबडे यांच्याशी संपर्क केला असता, आरोपी बँक व्यवस्थापक व शिपाई हे नागपूर व वर्धा या क्षेत्रात असल्याचे आमच्या यंत्रणेला समजले. त्यांच्या शोधासाठी दोन पथकं रवाना करण्यात आल्या असून लवकरच आरोपी गजाआड होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
राज्यभर खळबळ; विरोधक आक्रमक!
नापिकी, कर्जबाजारीपणा आणि उत्पादीत मालाला कवडीमोल बाजार भाव विविध समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या शेतकरी महिलेच्या अब्रुवर घाला घालण्याचा प्रकार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणताच, सर्वच क्षेत्रात या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्वत: हे प्रकरण उचलून धरले असतानाच, राजकीय पक्षांसोबतच सामाजिक संघटनांकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे. विरोधक कमालिचे आक्रमक झाले असतानाच, शासनाकडून या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष दिले जात आहे.
मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील प्रकाराबाबत तीव्र चिंता व्यक्त करतानाच, पिडीत महिलेला शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही भाजप महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा अॅड. माधवी नाईक यांनी दिली. कोणत्याही महिलेच्या अब्रुवर घाला घालण्याचा प्रकार कदापिही सहन केल्या जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी कुणाच्याही असहाय्यातेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणाºयाविरोधात कठोर कारवाईची शिफारस आपण शासनाकडे करणार असल्याचेही अॅड. नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.