साखरखेर्डा : गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाने ग्रामीण भागात थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत मायक्राे फायनान्स कंपनी सक्तीची वसुली करीत आहेत. एवढेच नाही तर अपशब्द वापरून महिलांना आपमानित करीत आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. याचा विचार करून सक्तीची वसुली थांबवावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता कडक निर्बंध लावण्यात आले आहेत़ त्यामुळे सर्वसामान्य माणूस कष्टकरी, मजूरवर्ग, शेतकरी, सध्या आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम नाही, माणसांच्या हाताला काम नाही, संध्याकाळी जेवणाची सोय नाही आणि त्यामध्ये मायक्रो फायनान्स, ग्रामीण कुटावाले व इतर फायनान्सवाल्यांनी कोरोना संकट काळामध्ये ग्रामीण भागामध्ये जाऊन लोकांकडून सक्तीच्या वसुलीचा सपाटा लावला आहे.
त्यामुळे अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या मजूरवर्गाला मायक्रो फायनान्सवाल्यांच्या शक्तीच्या वसुलीमुळे आत्महत्येची वेळ आली आहे. ही सक्तीची वसुली थांबून दोन महिन्यांचा अवधी देण्यात यावा, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे़
मजूरवर्गाला काम नसल्यामुळे मायक्रो फायनान्स व इतर ग्रामीण कुटावाल्यांनी ग्रामीण भागातील सक्तीची वसुली थांबवावी; अन्यथा मनसे स्टाईलने अधिकाऱ्याला चोप देण्यात येईल.
- राधेश्याम बंगाळे
प्रसिद्धी प्रमुख मनसे