ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था!
लाेणार : ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक वेळा अपघात हाेत असल्याचे चित्र परिसरात आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी हाेत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात हाेत आहेत.
व्हायरल फिव्हरची साथ; ग्रामस्थ त्रस्त
जानेफळ : परिसरात वातावरणातील बदलामुळे व्हायरल फिव्हरची साथ सुरू आहे. अनेकांना सर्दी, ताप, खाेकल्याचा त्रास हाेत आहे. काेराेनाची हीच लक्षणे असल्याने ग्रामस्थांनी धास्ती घेतल्याचे चित्र आहे.
वार्षिक परताव्याला ऑनलाईनचे बंधन
बुलडाणा : जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिक जे विविध अन्नपदार्थांचे उत्पादन पॅकिंग, रिपॅकिंग करतात, अशा सर्वांना अन्नसुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत सादर करावयाचे वार्षिक विवरणपत्र फार्म डी-१ हे यापूर्वी कार्यालयात सादर केले जायचे, तथापि अन्नसुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार ते ऑनलाईन सादर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
मृत शिक्षकांच्या कुटुंबांना दिला मदतीचा हात
मेहकर : शिक्षकांचे दातृत्व अनेक प्रसंगात सिद्ध झाले आहे. त्याची प्रचिती मेहकर तालुक्यातील शिक्षक देत असून, प्रत्येक मृत शिक्षकांच्या कुटुंबाला लाखाची मदत स्वतः वर्गणीतून उभारलेल्या निधीमधून ते देत आहेत. आंध्रुड येथील पंडितराव देशमुख यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना ७१ हजारांचा निधी दिला.
कोरोनामुळे अंध व्यक्तींसमोर अंधार!
बुलडाणा : वर्षभरापेक्षा अधिक काळापासून प्रत्येकजण कोरोनाच्या संकटाचा सामना करीत आहे. त्यामुळे काहीतरी काम करून पोट भरणाऱ्या या अंध व्यक्तिंना तर अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे सामान्य माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असताना दुसरीकडे सर्वात जास्त अडचणी इतरांवर अवलंबून असणाऱ्या लोकांसमोर निर्माण झाल्या आहेत. यात दिव्यांग व्यक्तिंचा समावेश आहे. कोरोनामुळे अंध व्यक्तींसमोर अंधार झाला असून, दररोजच्या उदरनिर्वाहासाठी अडचणी येत आहेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याची प्रतीक्षा
साखरखेर्डा : तालुक्यातील सातही मंडळांत अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील १०५ गावांत ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला. परंतु, शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा रक्कम मिळाली नाही. पीकविमा रक्कम तत्काळ मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खरीप हंगामाच्या पेरणीचे दिवस जवळ आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मागील हंगामातील पीकविम्याची रक्कम मिळाली, तर यंदा पेरणीसाठी आर्थिक मदत होऊ शकते.
शेतमाल घरातच पडून, शेतकरी संकटात
किनगाव राजा : फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत आहे. एप्रिल महिन्यापासून शासनाने निर्बंध लावल्याने शेतमाल घरातच पडून आहे. संचारबंदी असल्याने अनेक व्यापारी गावाकडे फिरकलेच नाहीत. निसर्गाचा लहरीपणा, कोरोना महामारीचे संकट अशा विविध अडचणींमुळे किनगाव राजा परिसरातील शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पेरणी अडचणीत सापडली आहे.
आरओ प्लांटची तपासणी सुरू करण्याची गरज
बुलडाणा : विनापरवाना सुरू असलेल्या बहुतांश आरओ प्लांटच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणीच हाेत नसल्याचे चित्र आहे. पाणी तपासणारी यंत्रणाच नसल्याने, तसेच नगर पालिका, ग्रामपंचायत प्रशासन या आरओ प्लांटकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे.
खरीप हंगामावर काेराेनाचे सावट!
किनगाव जट्टू : गत वर्षीपासून काेराेना संकटामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यातच अतिवृष्टीमुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. पीक कर्जही मिळत नसल्याने खरीप हंगामातील पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्राेत्साहन अनुदान देण्याची घाेषणा केली हाेती. मात्र, तीही मिळाली नसल्याचे चित्र आहे.