मेहकर तालुक्यात ७८ पॉझिटिव्ह
मेहकर: तालुक्यात दररोज ७० ते १०० च्या आसपास कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. १३ मे रोजी शहर व ग्रामीण भागात एकूण ७८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
बुरशीनाशक कल्चर यंत्र धूळखात
बुलडाणा: निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीचा सामना करावा लागतो. त्यात बुरशीनाशक कल्चर मशीन हेसुद्धा टेक्निशियनअभावी वापरले जात नाही आणि ही यंत्रणा धूळखात पडली आहे. त्यामुळे तालुकास्तरावर या प्रमाणाच्या मूल्यांकनासाठी तसेच कल्चर मशीनसाठी टेक्निशियन नेमण्यात यावे, अशी मागणी जि.प. सदस्य जयश्री शेळके यांनी केली आहे.
कोरोना चाचण्या वाढविण्याचे निर्देश
बुलडाणा: कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे वेळीच चाचण्या केल्यास रुग्णांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना खबरदारी घेता येईल, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिलेले आहेत.
वर्षभरात ३२ बालविवाह रोखले
बुलडाणा: गेल्या वर्षभरामध्ये जिल्ह्यात ३२ बालविवाह रोखण्यात जिल्हा यंत्रणेला यश आले आहे. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असला तरी, जिल्ह्यात होणारे बालविवाह चिंताजनक आहे.
२७ रस्ते कामाची प्रतीक्षा
बुलडाणा: तालुक्यात ४० पैकी १३ पांदण रस्त्यांचे काम झालेले आहे. उर्वरित २७ रस्ते कामाच्या प्रतीक्षेत आहेत. पांदण रस्त्याच्या कामासाठी एका किलोमीटर मागे साधारणत: ५० हजार रुपयांचा खर्च येतो.
साखरखेर्डा येथे पुन्हा कोरोना
साखरखेर्डा : येथे पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. गुरुवारी येथे एकाच दिवशी १० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार सुरू असून, प्रत्येकाने खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सातबाऱ्यावर बोजा असल्याने अडचणी
हिवरा आश्रम: पीककर्जदार शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर इतर खासगी वित्तीय संस्थांचा बोजा असल्याचे कारण सांगून त्यांना पीककर्जापासून रोखण्यात येेते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पीककर्जापासून वंचित राहतो की काय, अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
स्थलांतरीतांची संख्या वाढली
धाड : महानगरांमध्ये कामासाठी गेलेल्या नागरिकांनी घरवापसी केल्याने परिसरात स्थलांतरितांची संख्या वाढली आहे. आरोग्य विभागाने त्यांच्यावर नजर ठेऊन खबरदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांकडे दुर्लक्ष
लोणार: पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले व्यक्ती आता स्वत:हून तपासणी करत नाहीत. तसेच आरोग्य विभागाकडूनही अशा व्यक्तीकडे दुर्लक्ष केल्या जाते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे.
विनाकारण बाहेर पडणाऱ्यांच्या दुचाकी सुसाट
बुलडाणा: कडक निर्बंधाच्या काळातही विनाकारण बाहेर पडणाऱ्यांच्या दुचाकीही रस्त्याने सुसाट धावत आहेत. पोलिसांनी बुलडाणा शहरातील प्रत्येक चौकात बंदोबस्त लावला. येणाऱ्या प्रत्येक दुचाकीचालकाची चौकशी सुद्धा केली. परंतु दुचाकी चालक वेगवेगळे कारणे सांगत आहेत.