विदर्भ हा मूलतः वैनगंगा व पैनगंगा या दोन नदीखोऱ्यांमध्ये बसलेला आहे. या प्रदेशाचा नैसर्गिक उतार हा दक्षिणपूर्व आहे. वैनगंगा नदी खोऱ्यातील वार्षिक पर्जन्यमान १ हजार ते ३ हजार मि.मी. तर पैनगंगा नदी खोऱ्यातील वार्षिक पर्जन्यमान ७०० ते १ हजार मी. मी. आहे. पैनगंगा नदीचा उगम बुलडाणा जिल्ह्यातून होतो. तर वैनगंगा मध्य प्रदेशातून विदर्भात येते. या अतिरिक्त पावसाच्या पाण्यामुळे वैनगंगा विदर्भाची प्राणदायिनी ठरू शकते. भौगोलिक विदर्भाचे हे बेसिक वास्तव वैनगंगा- नळगंगा ते पैनगंगा या नदीजोड प्रकल्पाला विदर्भाचे वॉटरग्रीड तयार करण्यास समर्थ ठरते. वैनगंगा - नळगंगा या ४२६ कि. मी. नदीजोड प्रकल्पाचा विदर्भातील सहा जिल्ह्यांना लाभ होतो. तर केवळ ४० ते ६० कि.मी. वाढीव कामातून पैनगंगा नदीवरील पेनटाकळी धरणाजवळील ऐनखेड ते दहीगाव या शिवारात पाणी सोडल्यास विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यांना त्याचा लाभ मिळतो. त्यामुळे वैनगंगा-नळगंगा ते पैनगंगा नदीजोड प्रकल्प विदर्भाची लाईफलाईन ठरू शकतो. वैनगंगा नदीजोड प्रकल्प विदर्भाचे वॉटरग्रीड होण्याची मागणी माँ जिजाऊ जलसमृद्धी नदीजोड प्रकल्प समितीचे अध्यक्ष वल्लभराव देशमुख, विष्णुपंत कुलवंत, कोषाध्यक्ष विकास डाळीमकर, सदस्य प्रवीण खंडेलवाल, भास्कर कदम, रवी पाखरे, ज्ञानेश्वर डहाके, सुरेंद्र खपके, महेंद्र गवळी यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, या मागणीला जयंत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
वैनगंगा नदीजोड प्रकल्प विदर्भाचे वॉटरग्रीड होण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 4:35 AM