ऑनलाइन लोकमतचिखली : जिल्हयात अजुनही अनेक केंद्रांवर तूर तशीच पडून आहे़ त्यामुळे सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान आ. राहूल बोंद्रे अधिकाऱ्यांशी चर्चा जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असतानाच शेतकऱ्यांनी कार्यालयाची तोडफोड केली.
सरकारच्या उदासीन धोरणामुळे व कर्मचाऱ्यांच्या वेळकाढूपणामुळे शेतकऱ्यांची तूर मोजण्यास दररोज विलंब होत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांसह जिल्हा कॉगे्रस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी बुलडाणा येथील भगीरथ कारखाना परीसरातील जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बुलडाणा जिल्हयातील प्रत्येक केंद्रावर हजारो क्विंटल तूर मोजमापाशिवाय उघडयावर पडून आहे़ सुरूवातील २२ एप्रिल पर्यंत खरेदी करू असे जाहीर केले व आता ३१ मे पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या घरी असलेली तूर सुध्दा त्यामुळे खरेदी केली जाईल, असे शासन एकीकडे म्हणत असताना अद्यापही २२ एप्रिलपर्यंतची तूर खरेदी केलेली नाही़ सदर तूर ही शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यापासून केंद्रावर आणलेली व ज्या गतीने शासन तूर खरेदी करीत आहे. त्या गतीने अजूनही एक महिना तूर खरेदी केल्या जावू शकत नाही़ तर दुसरीकडे मोसमी वारे अंदमानमध्ये पोहचले आहेत, ते केव्हाही येथे धडकू शकतात, अशावेळी पाऊस पडून केंद्रावरील तूर जर ओली झाली, तर बळीराजा कोलमडून पडेल, कारण याच तुरीच्या भरवशावर खरीप हंगामाचे पिक पेरणीचे नियोजन शेतकऱ्यंनी केलेले आहे. जर तूर मोजल्या गेली नाही तर त्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही़ सरकार असंवेदनशिल आहे, त्यांच्या नियोजनशुन्य कारभारामुळे शेतकरी घायकुतीला आला आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची भूमीका घेण्याऐवजी जगाच्या या पोशिंदयाला शिवराळ भाषेत बोलून त्यांच्या जखमेवर मिट चोळण्याचे काम सरकार करीत असून अधिकाऱ्यांच्या उडवाउडवीच्या उत्तरामुळे शेतकरी संतप्त झाल्याने त्यांनी कार्यालयात तोडफोड करून आपला रोष व्यक्त केल्याची प्रतिक्रीया आ.राहुल बोंद्रे यांनी दिली आहे. यावेळी आ.बोंद्रेंसह काँग्रेसचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते़.