खामगाव : शहरातील मुख्य रस्त्यावरील अवैध बांधकामासंदर्भात पालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीचा वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पालिकेने कोणतीही कारवाई केली नाही. तक्रारीकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भीकुलाल जैन यांनी मंगळवारी पालिकेसमोर डफडे बजाव आंदोलन केले.
शहरात व्यापारी संकुलाची निर्मिती करताना कोणत्याही प्रकारचे नियम पाळल्या जात नाही. सोबतच याबाबतच्या तक्रारींनाही पालिका प्रशासनाकडून केराची टोपली दाखविल्या जाते. खामगाव शहरातील नांदुरा रोडसह विविध रस्त्यावरील अवैध बांधकाच्या विरोधात २ मे २०१७ रोजी पालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. मात्र, तक्रार केल्यानंतर जवळपास एक वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान, पालिका प्रशासनाच्या वेळकाढू भूमिकेविरोधात तसेच अवैध बांधकाम करणाºया विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, डॉ. घुले यांनी बांधलेल्या संकुलाची सखोल चौकशी करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते भीकुलाल जैन यांनी मंगळवारी पालिकेच्या मुख्य गेट समोर डफडे बजाव आंदोलन केले. या आंदोलनानंतर आपल्या न्याय मागण्यांचे निवेदन मुख्याधिकाºयांना सादर केले.
डफडे बजाव आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही जैन यांनी निवेदनातून दिला आहे. अवैध बांधकामासोबतच शहरातील अतिक्रमण निमूर्लनासाठी पालिकेने प्रयत्न करण्याची मागणी जैन यांनी केली आहे.