बुलडाणा : विविध मागण्यांसाठी शालेय पाेषण आहार संघटनेच्या वतीने ३० जुलै राेजी सीटूच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली़ या वेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले़
या आंदोलनाचे नेतृत्व सीटूचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांनी केले होते. या आंदोलनात शेकडो कामगार महिला सहभागी झाल्या होत्या. या वेळी कामगार महिलांनी शासनविरोधी घाेषणा दिल्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, आश्रमशाळा, अनुदानित व विनाअनुदानित संस्थेमध्ये शालेय पोषण आहार कामगारांच्या मागण्या बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहेत. या कामगारांचा शाळेत पाच तास कामात वेळ जात आहे. परंतु तरीसुद्धा त्यांना ५० रुपये रोज याप्रमाणे नाममात्र दीड हजार रुपये मानधन दिले जात आहे. त्यामुळे या कामगारांना तेवढ्या पैशात महिना कसा भागवायचा, असा प्रश्न पडला आहे.
११ हजार रुपये मानधन देण्याची मागणी
शालेय पोषण आहार कामगारांना तामिळनाडू राज्याप्रमाणे ११ हजार रुपये मानधन देऊन २९ मे २०२१ च्या शासन निर्णयासंदर्भात फेरविचार करण्यात यावा. कामगारांना किमान वेतन देऊन त्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे, विद्यार्थ्यांना शाळेतच पोषण आहार शिजवून द्यावा, कामगारांना सेवा समाप्तीच्या वेळी सेवापूर्ती म्हणून एक लाख रुपये सानुग्रह अनुदान देऊन त्यांना तीन हजार रुपये प्रति महिना पेन्शन आदी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात पंजाबराव गायकवाड, ज्ञानेश्वर वाघमारे, समाधान राठोड, शोभा काळे, मणकर्णा जाधव, ऊर्मिला जाधव यांच्यासह असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.