- अनिल गवई
खामगाव : शहरात डेंग्यूचे गडद सावट असल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे. कीटकशास्त्रीय सर्वेक्षणात महिनाभरात ४८१ घरांमध्ये डासांची अंडी आढळून आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.
जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चव्हाण आणि सामान्य रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश टापरे यांच्या मार्गदर्शनात शहरात ६ आणि ७ आॅक्टोबर रोजी कीटकशास्त्रीय सर्वेक्षण राबविण्यात आले होते. तसेच हिवताप जनजागृती आणि सर्व्हेक्षण मोहिम राबविण्यात आलीे. यामध्ये संशयीत रूग्णांच्या रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तसेच साथरोग प्रतिबंधात्मक औषधांचेही वितरण करण्यात आले होते. मात्र, डेंग्यू आणि साथरोगाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता, १० आॅक्टोंबरपासून पुन्हा शहराच्या विविध भागात सातत्यपूर्ण कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये १०२ घरातील भांडी रिकामी करण्यात आली. तर ६२ ठिकाणी टेमिफास औषध टाकण्यात आले. दरम्यान, डेंग्यूची अळी आढळून आलेल्या भागात आरोग्य विभागाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.
यापूर्वी ३६७ घरात आढळली होती अंडी!
खामगाव शहरातील साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर ६ आणि ७ आॅक्टोबर रोजी खामगाव शहरात कीटकशास्त्रीय सर्वेक्षण राबविण्यात आले. यामध्ये ३६३५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी ३६७ घरांमध्ये डासांची अंडी आढळून आली होती. यावेळी ३१ जणांच्या मेगा टीमकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. हे येथे उल्लेखनिय!
पुन्हा ११४ घरात डासाची अंडी!
डेंग्यू आणि साथजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर १० आॅक्टोबर ते २५ आॅक्टोबर या १५ दिवसांच्या कालावधीत १६८४ घरांचा सर्वे करण्यात आला. आरोग्य सहायक बी.बी.बढे आणि आरोग्य सेवक एम.आर.वाघ यांच्या दोन सदस्यीय पथकाने प्रत्येकी ८ वार्डांमध्ये सर्वेक्षण केले. यावेळी ३३८३ भांड्यांची तपासणी करण्यात आली. यात १६४ भांड्यांत अळी आढळून आली.
शहरात पुन्हा मेगा सर्वेक्षण!
आरोग्य विभागाच्यावतीने १० ते २५ आॅक्टोबर या पंधरा दिवसांच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या कीटकशास्त्रीय सर्वेक्षणात ११४ घरांमध्ये डासांची अंडी आढळून आली. त्यामुळे पुन्हा एकदा शहरात मेगा सर्वेक्षण राबविण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.
या परिसरात हाय अलर्ट!
शहरातील गोपाळ नगर, गांधी नगर, महाराष्ट्र विद्यालय, केशव नगर, रंभाजी नगर, आईसाहेब मंगल कार्यालय, वामन नगर, समता नगर, बालाजी प्लॉट, पोस्ट आॅफीस, शिवाजी वेस, गोकुळ नगर, स्वामी समर्थ नगर, साबणे ले-आऊट, शिवाजी नगर, अभंग कॉलनी, मुक्तानंद नगर, जुना फैल, सावजी ले-आऊट परिसरात डेंग्यूची अंडी आढळून आलीत.