लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाची लाट ओसरली असताना पावसाळ्यात साथींचे आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, यंदा कोरोनाच्या संकट काळातही मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा एकही रुग्ण आढळला नसल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, कॉलरा आदी साथींचे आजार बळावतात. अशावेळी शहरांमधील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची उपचारार्थ झुंबड उडते. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. कोरोना काळात साथीच्या आजारांचा प्रभाव फारसा जाणवला नाही. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत तेव्हा डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, गॅस्ट्रो या साथींचे रुग्ण अत्यल्प प्रमाणात आढळले होते. तसेच गत सहा महिन्यात एकही रुग्ण आढळलेला नाही.
आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. डेंग्यू व मलेरियाचे डास स्वच्छ पाण्यावर वाढतात. यामुळे छतावरील टायर व इतर भांड्यांमध्ये पाणी साचू देऊ नका. घरातील भांडीही आठवड्यातून एकदा रिकामी करून कोरडा दिवस पाळा.घरातील डासांचे उत्पत्तीस्थाने शाेधून नष्ष्ट करण्याची गरज आहे. शिवराज चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी