कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत २१ जून ते १ जुलै या कालावधीत प्रत्येक दिवशी महत्त्वाच्या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी रोहिदास मासाळकर यांनी दिली. यावेळी कृषी उपसंचालक महेश झेंडे, कृषी अधिकारी कोळेकर, उपविभागीय कृषी अधिकारी वसंत राठोड, कृषी सहाय्यक नीळकंठ तायडे, कृषी अधिकारी पंचायत समिती श्रीकृष्ण चिंचोले व गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी व त्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिनिंग मिल व महाराष्ट्र कॉटन फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात स्मार्ट कॉटन हा प्रकल्प सुरू केला आहे. वाढता उत्पादन खर्च, मर्यादित हमीभाव व बाजार भावांनी उत्पादकामधील अज्ञान यामुळे कापूस पिकापासून उत्पादक शेतकऱ्यांना आकर्षक बाजारभाव मिळू शकत नाही, याची कारणे शोधली असता एक असमान लांबीच्या धाग्याचा कापूस एकत्र उपलब्ध, अस्वच्छ व भेसळयुक्त कापूस या कारणाने बाजारपेठेत कापसाला भाव मिळत नसल्याची माहिती रोहिदास मासाळकर यांनी दिली. एक गाव एक वन ही पद्धत जर शेतकऱ्यांनी राबविली तर कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना मिळू शकेल, असे मासाळकर यांनी सांगितले.
बीबीएफ लागवड तंत्रज्ञान
कृषी संजीवनी मोहिमेमध्ये रुंद वरंबा सरी तंत्रज्ञानाविषयी माहिती देण्यात येत आहे. बीजप्रक्रिया, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, कापूस एक गाव एक वाण, ऊस लागवड तंत्रज्ञान, कडधान्य व तेलबिया क्षेत्रात आंतरपीक तंत्रज्ञान, ‘विकेल ते पिकेल’, `मनरेगा`अंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, महत्त्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना यावर मार्गदर्शन करण्यात आले आहे.