- सदानंद सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात गेल्या वर्षी अखेरच्या टप्प्यातील कापसाच्या बोंडात बोंडअळीचे प्रमाण ६७ टक्क्यांपेक्षाही अधिक आढळून आल्याने त्यावर उपाययाेजना करण्यासाठी कृषी आयुक्तांनी १५ मे २०२० रोजीच्या पत्रातून सर्वसंबंधितांना बजावल्यानंतरही कापूस उत्पादक पट्ट्यात बोंडअळीचे प्रमाण चालू हंगामात प्रचंड वाढत आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या प्रतिबंधात्त्मक उपाययोजना अपयशी झाल्याचे आता पुढे येत आहे.फेब्रुवारी २०२० या महिन्यात कृषी विद्यापिठाने केलेल्या सर्वेक्षणानुसार शेतातील पिकाच्या हिरव्या बोंडात बोेंडअळीचे प्रमाण धक्कादायक होते. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात कापसाच्या बोंडाचे निरिक्षण करण्यात आले. त्यामध्ये पाचही जिल्ह्यात सरासरी ६७ टक्के बोंडामध्येगुलाबी बोंडअळी आढळून आली होती. त्यानंतर ती कापूस आणि पिकाच्या शेतातील अवशेषामध्ये सुप्तावस्थेत होती. पहिला पाऊस आल्यानंतर ती कोशातून बाहेर पडणार असल्याचेही निरिक्षण नोंदवण्यात आले. त्यामुळेच कापसाचे बीयाणे मे महिन्याच्या अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात बाजारात आणण्याचीही करण्याची शिफारस विद्यापिठाने केली होती. गेल्या वर्षी कापसाचा हंगाम फेब्रुवारी अखेरपर्यंतही सुरूच होता. त्यामुळे यावर्षी बीटी कापसाची पूर्वहंगामी लागवड झाल्यास बोंडअळीचा प्रचंड प्रादुर्भाव होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली होती. या संकटाचा सामना करण्याची तयारीही राज्यस्तरावरूच एप्रिलपासून करण्यात आली. त्यामध्ये अनेक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यानेच आता बोंडअळीचे संकट वाढत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.तसेच उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
या होत्या उपाययोजना
- पूर्वहंगामी लागवड रोखणे, 15 जूननंतरच पेरणी करणे, शेतातील कापसाचे पीक काढून
- त्याची विल्हेवाट लावणे, किडीचे अवशेष शेतात राहणार नाहीत, कोणताही ढिग शेतात
- न ठेवणे, कापसाचे मार्केट यार्ड स्वच्छ करणे, जिनिंगमधील कापसावर प्रक्रीया करून स्वच्छ करणे, तेथे कामगंध सापळे लावणे, 5 टक्के निंबोळी अर्क फवारणी करणे.