लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या पालखीचे मंगळवारी पहाटे खामगाव येथून शेगावकडे प्रस्थान झाले. विदर्भ माउलीला निरोप देण्यासाठी एकच गर्दी उसळली होती. यावेळी खामगाव येथून हजारो भाविकांनी श्रींच्या पालखीसोबत पायदळ वारी केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाचे आषाढी एकादशीला दर्शन घेवून ही पालखी परतीच्या मार्गाला लागली. दरम्यान, दोन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर श्रींची पालखी सोमवारी सकाळी खामगावात पोहोचली. खामगावात ठिकठिकाणी पालखीचे मनोभावे स्वागत करण्यात आले. सोमवारी खामगावात मुक्कामी असलेल्या पालखीतील वारकºयांना श्रध्देचा निरोप देण्यात आला. त्यानंतर, मंगळवारी पहाटे ५ वाजता श्रींच्या पालखी संत नगरी शेगावकडे मार्गस्थ झाली. तत्पूर्वीच खामगाव आणि परिसरातील हजारो नागरिक, भाविक शेगावकडे निघाले होते. संत गजानन महाराजांच्या पालखीत सहभागी होण्यासाठी खामगाव आणि परिसरच नव्हे तर, नांदुरा, मलकापूर, चिखली, उंद्री, सिंदखेड राजा, बुलडाणा येथील भाविक खामगावात दाखल झाले होते. आपली वाहने खामगावात ठेवून, हजारो भाविकांनी दिंडी मार्गावरून माउलींसोबत पायी वारी केली.
गजानन महाराजांच्या पालखीचे शेगावकडे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 11:41 AM