शेगाव : १३ जून रोजी सकाळी ७ वाजता शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांच्या पालखीने मंदिरामधून ७०० वारकऱ्यांसह हजारो भाविक भक्तांच्या सहभागाने राजवैभवी थाटात आषाढी एकादशी महोत्सवात सहभागी होण्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान केले आहे. संतनगरीत श्रींच्या पालखीच्या निमित्ताने टाळ मृदंगासह हरिनामाचा नामघोषात संत नगरी दुमदुमली आहे.
श्रीं ची पालखी अकोला, वाडेगाव, पातूर, डव्हा, रिसोड, परमणी, परळी वैजनाथ,उस्मानाबाद, तूळजापूर, सोलापूर या मार्गाने ३३ दिवसा पायीवारी करीत एकूण ७५० किलोमिटर प्रवास करीत १५ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्रींच्या पालखी मुक्कामास पोहोचणार आहे.
५ दिवसापर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखीचा मुक्कामास राहील. आषाढी एकादशी सोहळा व काला आटोपल्यावर २१ जुलै रोजी सकाळी श्रींची पालखी शेगांवकडे परतीच्या मार्गाने प्रस्थान करेल. ११ ऑगस्ट रोजी पालखी खामगाव मार्गे संतनगरी शेगावला परत येईल.
भाविकांनी नागझरीपर्यंत पायी चालून दिला निरोप
संत गजानन महाराज यांच्या पंढरपूर येथे जाणार्या पालखीला निरोप देण्याकरिता अनेक भाविक शेगावात दाखल झाले होते. गुरुवारी वारीला येणारे भाविक तसेच विदर्भ, खान्देशातील, मराठवाडा, मुंबई, पुणे, नागपूर येथील श्रींच्या भाविकांनी श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी एकादशीच्या वारीला माऊली जात असल्याने दर्शन घेतले. तसेच श्री क्षेत्र नागझरीपर्यंत पायीं वारी करुन माऊलीच्या पालखीला निरोप दिला.
३३ दिवसांत ७५० किमीचा प्रवास
श्रींची पालखी वेगवेगळ्या ९ जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करीत शेगांव ते पंढरपूर प्रवास ३३ दिवसाचा ७५० कि.मी. चे अंतर पार करते. श्रींचे पालखी सोबत ७०० वारकरी मंडळीसह २ अश्व व ९ वाहने आहेत. वारकऱ्यांकरीता ऑम्बुलन्स गाडी डॉक्टर व सहकार्यासह आहे. याव्दारे श्री पालखीतील व वाटचालीमध्ये असणाऱ्या इतर दिंडीतील वारकऱ्यांकरीता औषधोपचार केल्या जातो. वारकऱ्यांकरीता पाणी पिण्याकरीता टँकरची व्यवस्था आहे. श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे १५ जुलै रोजी पोहोचणार आहे.