लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत शेतकर्यांमध्ये उदासनीता दिसत असून, या प्रक्रियेबद्दलचे अज्ञान यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे अनेक पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र शासनाने जून २0१६ पर्यंत पीककर्ज थकीत असलेल्या राज्यातील शेतकर्यांना दीड लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. याकरिता इच्छुक पात्र शेतकर्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. हे अर्ज भरण्याकरिता अगोदर ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. आता त्यात १५ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली; मात्र अनेक शेतकरी या प्रक्रियेपासून अनभिज्ञ असून, त्यांच्यात ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत उदासिनता दिसून येत आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत अर्ज दाखल करण्यापासून अनेक शेतकरी वंचित राहू शकतात. परिणामी त्यांच्यावर कर्जमाफीला मुकण्याची वेळ येवू शकते. ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत शेतकर्यांमध्ये माहितीच्या अभावामुळे ते या प्रक्रियेपासून दूर राहत आहेत. त्यामुळे शेतकर्यांना यासंदर्भात मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झालेली आहे. तर शासनाने कर्जमाफीचे अर्ज ऑफलाइन स्वीकारावेत, अशी मागणी सुद्धा शेतकरीवर्गाकडून होत आहे.
मलकापुरात शिवसेनेच्यावतीने एसडीओंना निवेदन : ग्रामपंचायतमधील केंद्र सुरू करण्याची मागणीमलकापूर : मलकापूर तालुक्यात ४८ ग्रा.पं. असून, या ग्रामपंचायती अंतर्गत अद्यापही कर्जमाफीच्या दृष्टिने ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता केंद्र सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकर्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बाबींची दखल घेत २२ ऑगस्ट रोजी शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे यांच्या नेतृत्वात पदाधिकार्यांनी केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकरी व केंद्र संचालकांशी चर्चा केली. यावेळी अनेक तांत्रिक अडचणी आढळून आल्या. या बाबीला गांभीर्याने घेत शिवसेनेच्यावतीने एसडीओंना निवेदन देण्यात आले. यामध्ये शासनाची कर्जमाफीची अर्ज भरण्याची प्रक्रिया ही अत्यंत किचकट, गुंतागुंतीची व आर्थिक नुकसानदायी व मानसिक त्रासाची ठरत असल्याचे नमूद केले आहे. या प्रक्रियेतील त्रास दूर करुन आपले सरकार केंद्रावरील अडचणी दूर करण्यात याव्यात व बंद असलेली केंद्रे तत्काळ सुरु करण्यात यावी, अन्यथा शेतकरी हितास्तव शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारासुद्धा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठेसह तालुका उपप्रमुख विनायक जवरे, ओंकारसिंह डाबेराव, अनंत गायगोळ, गजानन धाडे, एकनाथ डोसे, भागवत मस्कादे, विनोद बोदवडे, शामराव बिर्हाडे, सचिन सोनोने, भागवत पाटील, जगन रायपुरे, जितू पाटील आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
थम्ब डिव्हाईसच उपलब्ध नाहीतऑनलाइन अर्ज भरण्यासाठी थम्ब डिव्हाईस आवश्यक असून, त्याशिवाय आधार कार्डचा डाटा लिंक होत नाही; परंतु खामगावसह विविध तालुक्यात अद्याप या मशीन उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया रखडलेली आहे. जिल्ह्यात २२ ऑगस्टपासून या डिव्हाईसचे वाटप सुरु झाले असून, खामगावात गुरुवार, २४ ऑगस्टला सदर डिव्हाईस प्राप्त होणार असल्याचे समजते.
ग्रामपंचायतींमधील केंद्र निरुपयोगीशासनाने ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई सेवा केंद्र व ग्रामपंचायतींमधील संग्राम केंद्र अशा तीन ठिकाणी सोय केलेली आहे; परंतु बहुतांश ग्रामपंचायतींमधील संग्राम केंद्र बंद पडलेले असून तेथे हे अर्ज भरण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकर्यांना अर्ज भरण्यासाठी शहरांकडे धाव घ्यावी लागत आहे.