दुसरबीड : काेराेना संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत लाॅकडाऊन वाढवले असून, या दरम्यान आठवडी बाजार भरवण्यास बंदी घातली आहे. मात्र, दुसरबीड येथे मंगळवारी रस्त्यावरच आठवडी बाजार भरवण्यात आला होता. तसेच या बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. त्यामुळे, काेराेना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
जिल्हाभरात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत लाॅकडाऊन केले असून, आठवडी बाजारांना बंदी घातली आहे. मात्र, मंगळवारी दुसरबीड येथे भाजीपाला विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी व इतरांनी रस्त्यावरच दुकाने थाटली हाेती. दुकाने महामार्गाच्या दोन्ही बाजूनी थाटल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला हाेता. अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांनी आपली वाहने त्यात भर म्हणून रोडवर उभी करून ठेवली होती. त्यामुळे या रोडवर वाहतुकीची कोंडी झाली. ही वाहतूक सुरळीत करण्याकरिता कुणीही प्रयत्न केले नाही. भाजीपाला विक्रेत्यांना आपले दुकान सुरु करण्याकरिता बाजार भरतो त्या जागेवरच जागा दिली असती तरी ही गर्दी टाळता येऊ शकत होती व वाहतुकीला होणारा खोळंबा टाळता आला असता. परंतु याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष नसल्याचे चित्र आहे.