- योगेश फरपटखामगाव : अपंग व्यक्तींना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन एकीकडे प्रयत्नशील असतांना बुलडाणा जिल्हयात मात्र अपंगांना सेवा सुविधांपासून वंचीत ठेवण्यात येत असल्याचे वास्तव आहे. जिल्हयातील खामगाव ग्रामिणसह अनेक ग्रामपंचायतींना अपंगांसाठीचा निधी खर्च केला नसल्याने अपंगांना मिळणाºया सुविधा अद्याप प्राप्त होवू शकल्या नाहीत. समाजातील दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व कुष्ठरोगमुक्त अपंग व्यक्तींकडे त्यांच्या अपंगत्वाकडे न पाहता त्यांच्यामध्ये असलेल्या सामर्थ्यांकडे पाहून त्यांच्या मधील असलेले सुप्त सामर्थ्य विकसित करुन त्यांना समाज जीवनाच्या सर्व अंगामध्ये समान संधी, संपूर्ण सहभाग व त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय, तसेच इतर विविध विभागांमार्फत कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत अपंगांना विविध योजनांचा लाभ दिल्या जातो. याशिवाय प्रत्येक ग्रामपंचायतीला ३ टक्के निधी हा अपंगावर खर्च करावा लागतो. चालू वर्षापासून ५ टक्के निधी खर्च केला जाणार आहे. या निधीचा विनियोग हा अपंगांना गरजेनुसार वस्तू किंवा रोख रकमेच्या स्वरूपात केला जातो. ग्रामपंचायत स्तरावरील समिती त्याचे नियोजन करते. प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींनी हा निधी अद्याप खर्च केला नाही. यामध्ये खामगाव ग्रामिण ग्रामपंचायतीसह विविध ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
माझ्या आधीच्या ग्रामसेवकाने हा निधी खर्च केला नाही. मी काही महिन्यापूर्वीच पदभार घेतला आहे. निधी खर्चाचे नियोजन झाले आहे. ग्रामपंचायत समितीने ठरवल्यानुसार लवकरच एखादा कार्यक्रम घेवून निधीचे होणार आहे. - गजानन सोळंके, ग्रामसेवक, खामगाव ग्रामिण
ग्रामपंचायतींना हा निधी खर्च करावाच लागतो. सर्वच ग्रामपंचायतींना निधी खर्च केला आहे. खामगाव ग्रामिणचा विषय असेल तर याबाबत गटविकास अधिकारी सांगू शकतील. - संजय चोपडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत, जि.प.बुलडाणा
सरकार सुरवातीपासून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरत आहे. अपंगाना सुद्धा त्यांनी सोडले नाही. अपंगांना सेवा सुविधा न पुरविल्यास पंचायत समितीसमोर डफडे बजाओ आंदोलन छेडण्यात येईल. - दिलीपकुमार सानंदा, माजी आमदार, खामगाव
अपंगांना सेवा सुविधा पुरवल्या गेल्याच पाहिजे. दिरंगाई करणाºया अधिकारी, कर्मचाºयांना धडा शिकवू. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाशी संपर्क करतो. - बच्चू कडू , आमदार तथा संस्थापक, प्रहार संघटना