लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन स्थलांतरीत करण्यापूर्वी राष्ट्रीय महामहामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास पालिकेने तीव्र विरोध दर्शविला. मात्र, पालिकेच्या विरोधाला न जुमानता संबंधीत कंत्राटदाराकडून रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या दुतर्फा नाली बांधकाम केले जात आहे. त्यामुळे पालिकेने कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.
खामगाव शहरातून जाणाºया राष्टीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास गेल्या महिनाभरापासून सुरूवात करण्यात आली. यामध्ये बाळापूर नाका ते विकमसी चौक आणि विकमसी चौक ते टिळकपुतळा पर्यंत नाली बांधकाम करण्यात येत आहे. पाणी पुरवठ्याची पाईपलाईन स्थलांतरीत न करताच, नाली बांधकाम करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे रोडची संरचना करताना चक्क सेंटरलाईन सोडून काम केले जात आहे. परिणामी, शासकीय कार्यालयांसोबतच सर्व सामान्य आणि या रस्त्यावरील व्यापारीही वेठीस धरल्या जात आहे. कंत्राटदाराच्या मनमानीचा प्रत्यय पालिका प्रशासनालाही येत असून, पालिकेने यापूर्वीच कंत्राटदाराचे काम थांबविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाला पत्र दिले आहे. या पत्राची प्रतिलिपी जिल्हाधिकाºयांनाही सादर केली आहे. मात्र, पालिकेच्या विरोधाला न जुमानता या कंत्राटदाराकडून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत, नालीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे सोमवारी पुन्हा पालिकेने संबंधीत कंत्राटदाराला दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.
चौकट...
कंत्राटदाराची मनमानी; नागरिक वेठीस!
रस्त्याची संरचना करताना कंत्राटदाराकडून मनमानीपध्दतीने सेंटर लाईन बदलण्यात येत आहे. पाणी पुरवठ्याची पाईपलाईन स्थलांतरीत न करताच नालीचे बांधकाम केले जात आहे. त्यामुळे पाईप लाईनला गळती लागल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. परिणामी, पाणी पुरवठा प्रभावित झाल्याने, अनेक भागातील नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागले. एंकदरीत कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे सामान्यांसह शासकीय कार्यालयेही वेठीस धरल्या जात आहे.
रात्रीच्या अंधारात नालीचे बांधकाम!
पालिका प्रशासनाने बांधकाम थांबविण्याचे पत्र दिल्यानंतरही जान्दू कन्ट्रक्शन कंपनीकडून रात्रीच्या अंधारात नालीचे काम करण्यात आले. रविवारी रात्री सोबतच सोमवारीही काही ठिकाणी कंत्राटदाराकडून काम करण्यात येत होते. पाईपलाईन स्थलांतरीत न करताच काम करण्यात येत असल्याने, पालिका प्रशासनाच्या पत्राकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडून कानाडोळा केल्या जात असल्याची चर्चा पालिका वर्तुळात होती.