मोताळा (बुलडाणा) : तालुक्यातील दहिगाव व उर्हा परिसरात १३ डिसेंबरच्या रात्री झालेल्या चक्रीवादळासह गारपीट व पावसामुळे परिसरातील शेतकर्यांची जवळपास तीस एकरावरील केळींची बाग भुईसपाट झाली आहे. त्यामुळे दहिगाव व उर्हा परिसरातील ११ शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मोताळा तालुक्यातील दहिगाव व उर्हा शिवारामध्ये अनेक शेतकर्यांनी केळी पिकाची लागवड केली असून, या पिकाला १८ ते २२ महिन्यांचा कालावधी लागतो. जवळपास १ लाखापर्यंत प्रती हेक्टरी खर्च येणार्या या पिकाला जगवण्यासाठी २२ महिन्यांच्या कालावधीत शेतकर्यांना तारेवरची कसरत करावी लागते; परंतु १३ डिसेंबरच्या रात्री ८ वाजेच्या दरम्यान झालेल्या दहिगाव व उर्ह शिवारात चक्रीवादळासह पाऊस व गारपिटीमुळे शेतकर्यांच्या केळीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास अर्धा ते पाऊण तास चक्रीवादळाचे थैमान, त्यातच १५ मिनिटांपर्यंत गारपीट व वेगाच्या वार्यासह झालेल्या पावसामुळे ऐन कटनवर आलेले शेतकर्यांचे (कांदय़ा बाग) केळीची हजारो झाडे फळांसह जमीनदोस्त झाली. यामध्ये दहिगाव येथील शेतकरी नारायण डिके यांची २५00 हजार झाडे, मनोज चौधरी यांची २ हजार, प्रभाकर डिके यांची १७00, भगवान डिके यांची १000, कैलास शेळके यांची १५00 झाडे, तर उर्हा येथील शेतकरी शंकरसिंग राजपूत यांची ३ हजार, राजेंद्रसिंग राजपूत यांची ३ हजार, महादेवसिंग राजपूत यांची २ हजार, देवीदास नेरकर यांची ३ हजार, रामदास नेरकर यांची १५00, अनिता विठ्ठलसिंग राजपूत यांची ३ हजार केळीची झाडे फळासह वारा-पावसाने जमीनदोस्त झाली आहेत. कधी नव्हे ते सद्य:स्थितीत केळीला प्रती क्विंटल १२00 पर्यंत भाव आहे; मात्र १३ डिसेंबरचा रात्रीचा वादळी पाऊस अनेक शेतकर्यांना आर्थिक फटका देऊन गेला. यावर्षीच्या अत्यल्प पावसाने तालुक्यातील शेतकर्यांचे कापूस, सोयाबीन पीक हातातून गेले आहे. त्यामुळे सिंचनाची सोय असलेले तालुक्यातील थोडेफार शेतकरी भाजीपाल्यासह केळीचे अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करीत आहे; मात्र निसर्गाच्या बेमोसमी अवकृपेमुळे काल झालेल्या वादळी पावसात जवळपास २४ ते २५ हजार केळींची लदबदलेली बाग जमीनदोस्त झाली. यामुळे सदर कुटुंबांची अवस्था बिकट झाली असून, शेतीशिवाय दुसरी मिळकत नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तीस एकरावरील केळी उद्ध्वस्त
By admin | Published: December 15, 2014 12:36 AM