साखरखेर्डा गावातील काही शेतकऱ्यांकडे पाळीव गायी, म्हैशी, वगार अशी जनावरे आहेत. ही जनावरे सकाळी मोकाट सोडली जातात. या जनावरांची संख्या १०० ते १२५ च्या जवळपास असून, सकाळी ही जनावरे गावखोरीत असलेल्या शेतात घूसून उभी पिके मनसोक्त फस्त करीत आहेत. एवढेच नाही तर शेतात धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शेतातील मूग, उडीद चांगला बहरला असून, शेंगा लागल्या आहेत. तोडणीला काही दिवसांचा अवधी बाकी आहे. सोयाबीन हे पीकही चांगले आले आहे. साखरखेर्डा ते शेंदुर्जन रोडवरील पिकांवर ही जनावरे मनसोक्त ताव मारत आहेत. या अगोदर माजी सरपंच कमलाकर गवई, दिलीप इंगळे, रामदाससिंग राजपूत यासह २५ ते ३० शेतकऱ्यांनी जनावरांच्या बंदोबस्तासाठी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही केली होती. ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून ज्यांची पाळीव जनावरे असतील त्यांनी सांभाळावी अन्यथा कारवाई करण्यात येईल असे नमूद केले होते. परंतु यावर काहीच कारवाई झाली नसल्याने मोकाट जनावरांचा उपद्व्याप सुरु आहे. गुरूवारी कमलाकर गवई आणि दिलीप आश्रू इंगळे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीला निवेदन देऊन साखरखेर्डा येथे कोडवाडा तयार करावा. त्यात या जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. ग्रामपंचायत यावर काय निर्णय घेते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पाळीव प्राणी मोकाट , उभ्या पिकांची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:39 AM