मेहकर : यंदाच्या गणेशोत्सवासाठी आता मूर्ती तयार करण्याची धांदल सुरू झाली असून, ‘इकोफ्रेंडली बाप्पा’साठी आगाऊ नोंदणी सुरू झाली आहे. काळी माती व शाडू मातीच्या मूर्तींना यंदाही मागणी वाढली असून सार्वजनिक मंडळांनीही अशा मूर्तींसाठी पुढाकार घेतला आहे. पुणे येथील चाकण आळंदी फाटा परिसरातील छोट्या-मोठ्या उद्योग व्यावसायिक व तरुण मंडळीकडून देऊळगाव माळीच्या इकोफ्रेंडली बाप्पाला पसंती दिली जात आहे.
यासाठी एकशे दहा वर्षांची परंपरा लाभलेल्या देऊळगाव माळी येथील महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट मूर्तिकार पुरस्कार प्राप्त मूर्तिकार हरिभाऊ राजाराम राऊत यांनी तयार केलेल्या काळ्या मातीची इकोफ्रेंडली मूर्ती मिळण्यासाठी चाकण आळंदी फाटा परिसरातील अनेक उद्योजकांनी मागील वर्षी मागणी केली; परंतु मागील कोरोनाच्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार राज्यभर लॉकडाऊनची परिस्थिती असल्यामुळे त्या उद्योजकांची ती मागणी पूर्ण होऊ शकली नाही; परंतु यावर्षी मात्र या गणेशोत्सवामध्ये मूर्तिकार हरिभाऊ राऊत यांच्या हस्ते बनलेली इको फ्रेंडली गणेशमूर्तीची मागणी वाढली आहे. देऊळगाव माळी येथील मूर्तिकार हरिभाऊ राऊत यांनी पुणे येथे देऊळगाव माळीतील काळी माती नेऊन तेथील गणेशभक्तांच्या मागणीनुसार त्या ठिकाणी इकोफ्रेंडली गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू केले आहे. चाकण परिसरातील उद्योजकांचे हे एक प्रातिनिधिक उदाहरण असले तरी इकोफ्रेंडली मूर्तीची परंपरा जपलेल्या अनेक कारागीर व संस्थांकडेही अशीच परिस्थिती यंदा आहे. काळ्या मातीपासून तयार केलेली मूर्ती असली, तरी ती मजबूत असते. ती विसर्जित केली, तरीही पाणी प्रदूषित होत नाही. तसेच पाण्याने भरलेल्या बादलीमध्ये विसर्जन केले की, ते पाणी शेतामध्ये खत म्हणून वापरता येते.
उत्सवाचा आनंद घेताना पर्यावरणाशी नाते
मूर्तिकार हरिभाऊ राऊत यांनी उत्सवाचा आनंद घेताना पर्यावरणाशी नाते जोडले आहे. मागील ४० वर्षांपासून देऊळगाव माळी व परिसरात सार्वजनिक मंडळांसाठी एक ते पाच फुटांपर्यंत मूर्ती त्यांनी तयार करून दिलेल्या आहेत. २०१८ मध्ये महाराष्ट्र शासनाने हरिभाऊ राऊत यांना उत्कृष्ट मूर्तिकार पुरस्कार देऊन सन्मानित केल्यानंतर इकोफ्रेंडली गणेशमूर्तीची स्थापना आपणही करावी, अशी अनेक सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये जनजागृती निर्माण झाली.