ग्रामीण भागात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. प्रत्येक गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली होती. कोणत्याही परिस्थितीत कोरोना संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साळवे यांनी पाचही प्राथमिक आरोग्य केंद्राला सतर्क राहावे असे आदेश दिले होते. ग्रामीण भागातील नागरिकांची तपासणी मोहीम गतिमान करुन लो रिक्स मधील रुग्णांना होम क्वारंटाईन करुन उपचार केले. तर गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही गावात प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले होते. याचा परिणाम कोरोना संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी झाला. देऊळगाव कोळ ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, मलकापूर पांग्रा यांनी देऊळगाव कोळ उपकेंद्रात एक कक्ष स्थापन करुन गावात कोरोना रुग्ण आढळून आल्यास त्या रुग्णांवर तत्काळ उपचार व्हावेत, यासाठी दक्षता घेतली. आज देऊळगाव कोळ गाव कोरोनामुक्त झाले असून येथे लसीकरण केंद्रही सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती सरपंच शालू राजू गायकवाड आणि सचिव लिंबाजी इंगळे यांनी दिली.
देऊळगाव कोळ कोरोनामुक्त, लसीकरण सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 4:25 AM