जमात-ए-इस्लामी हिंदचा उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगाव राजा : सर्व धर्मातील समाजबांधवांपर्यंत ज्ञान, समजूतदारपणा आणि त्यांना अध्यात्मिकतेच्या प्रकाशाकडे घेऊन जाण्याच्या उद्देशाने दिनांक २२ ते ३१ जानेवारी या कालावधीत जमात-ए-इस्लामी हिंदकडून ‘अंधारातून प्रकाशाकडे’ हे दहा दिवसीय अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला देऊळगाव राजात प्रारंभ झाला.
कोरोना महामारीच्या संकटामुळे माणूस निराशेच्या गर्तेत लोटला गेला आहे. महाराष्ट्रात या संसर्गाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होता. निराशेच्या गर्तेतून आशावादी व्यवस्थेकडे सर्व धर्मातील समाजबांधवांना नेण्यासाठी राज्यातील ११ कोटी जनतेपर्यंत प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया याचबरोबर व्यक्तिगत संपर्काद्वारे पोहोचण्यासाठी जमाते-ए-इस्लामी हिंद या सामाजिक संघटनेकडून ‘अंधारातून प्रकाशाकडे’ या अभियानाला प्रारंभ करण्यात आल्याची माहिती स्थानिक जमात-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष शेख लुकमान यांनी दिली. या अभियानाच्या माध्यमातून शुद्ध विज्ञानवादी निर्मिकावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.