लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : देऊळगाव राजा शहरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. तालुक्यातील जनतेसाठी ही चिंतेची बाब आहे. येथील समर्थ कृषी महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये ४३ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोची ही साखळी तोडण्यासाठी शहरात दहा दिवसाचा कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून या बंदला व्यापाऱ्यांसह शहरवासीयांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या चार दिवसात मोठ्या प्रमाणात संसर्गित रुग्ण आढळल्याने देऊळगाव राजा शहरात जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळून सहकार्याची भूमिका दर्शविली आहेकोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने शुक्रवार पासून दहा दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते.यामध्ये जीवनावश्यक वस्तू म्हणून किराणा भाजीपाला दुकाने सकाळी सात ते नऊ पर्यंत उघडी ठेवण्यात येत आहेत. तर दवाखाने, लॅब, मेडिकलला या जनता कर्फ्यूतून वगळण्यात आले आहे. व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून चांगला प्रतिसाद दिला आहे. जनता कर्फ्यूच्या काळात दुकाने उघडे ठेवणाºयास दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चार दिवसात शहरात पॉझिटिव्ह रुग्ण सारखे वाढत असल्याने चिंता वाढली आहे. चिखली रोडवर असलेल्या समर्थ कृषि महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये ४३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. अनेक जणांना क्वारंटीन करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, याच बरोबर नियमांचे पालन करून दक्षता बाळगावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रतिबंधित क्षेत्रदेऊळगाव राजा शहरातील जुना जालना रोड, दुर्गापुरा, अहिंसा मार्ग, सराफा लाईन, महात्मा फुले रोड, अग्रसेन चौक, वाल्मीक नगर, गढी परिसर, चौंडेश्वरी मंदीर परिसर, तांबटकर गल्ली, जाफ्राबाद वेस, आंबेडकर नगर, पोस्ट आॅफीस परिसर, संपूर्ण सिव्हील कॉलनी परिसर, शाम कॉलनी, आदर्श कॉलनी, बालाजी नगर हा भाग प्रतिंबधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आला आहे. हा परिसर सील करण्यात आलेला आहे.
व्यापाऱ्यांचा पाठींबादेऊळगाव राजा शहरातील व्यापाºयांनी नगरपालिका कार्यालयात मुख्याधीकाºयांशी चर्चा करून १७ ते २६ जुलै पर्यंत १० दिवसीय जनता कर्फ्यूला पाठींबा दिला आहे. त्यामुळे शहरातील सर्व व्यापार पेठ बंद ठेवण्यात आल्या आहे. सर्व रुग्णांलयांना बंदमधून सूट देण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवा सुरूफळ व भाजीपाला फिरते व्यवसाय सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. तसेच शेती संदर्भातील कृषि व्यवसायाची दुकाने ११ वाजे पर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. कंटेनमेन्ट झोनमधील सर्व आस्थापणा-दुकान -प्रतिष्ठाण- बँका -हॉटेल बंद आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्यात आले आहे.