लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: तक्रारकर्त्याच्या पत्नीस पालिकेत वारसा हक्काने सफाई कामगार म्हणून नोकरी लावण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना देऊळगाव राज्याच्या नगराध्यक्ष यांच्या पतीस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चार सप्टेंबर रोजी रंगेहात अटक केली. दरम्यान, त्यांच्या सोबतच त्यांचे सहाय्यक असलेल्या आणखी एकासही ताब्यात घेण्यात आले आहे. बुलडाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चार सप्टेंबर रोजी ही कारवाई केली. या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.तक्रारकर्त्या व्यक्तीची आई पालिकेतून सफाई कामगार म्हणून सेवानिवृत्त झाली होती. त्यानुषंगाने त्यांच्या जागेवर पत्नीला सफाई कामगार म्हणून वारसा हक्काने सामावून घ्यावे यासंदर्भाने तक्रारकर्त्याचा देऊळगाव राजा नगराध्यक्षांचे पती डॉ. रामदास श्यामराव शिंदे (६१) यांच्याशी संपर्क आला होता. त्यानुषंगाने देऊळगाव राजा पालिकेत अनुषंगीक ठरावात नाव टाकण्यासाठी डॉ. रामदास शिंदे यांनी ८० हजार रुपयांची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने बुलडाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. त्यावरून २८ आॅगस्ट रोजी पडताळणी कार्यवाही दरम्यानही आरोपी डॉ. रामदास श्यामराव शिंदे यांनी तक्रारकर्त्याकडे ८० हजार रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले होते. प्रकरणी चार सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने प्रत्यक्ष सापळा रचून डॉ. रामदास शिंदे यांना त्यांच्या हॉस्पीटल व राहते घरी ८० हजार रुपये लाच स्वीकारताना व ते पैसे त्यांचे सहाय्यक तथा माजी नगरसेवक प्रवीण भगीरथ बन्सीले (४९, रा. दुर्गा चौक, देऊळगाव राजा) यांच्याकडे देताना रंगेहात पकडले. हे दोघेही सध्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात आहेत. या कारवाईमुळे देऊळगाव राजा शहरात खळबळ उडाली.