सिंदखेडराजा : मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यातून ८५ किलो वजनाची तोफ चोरीला गेली असून, त्या ऐतिहासिक तोफेची किंमत पुरातत्व विभागाचे अभिरक्षक एम.वाय.कामठे यांनी फक्त ४५00 रुपये काढली आहे. या प्रकाराचा सिंदखेडराजा येथे निषेध करण्यात आला असून, ही किंमत काढणार्या अभिरक्षक कामठे यांचा निषेध करणारे निवेदन देण्यात आले.सिंदखेडराजा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा, शिवसेना यांसह सामाजिक संघटना यांनी तहसीलदार संतोष कणसे यांना निवेदन देऊन कामठे यांच्या या कृतीचा निषेध केला आहे. लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यावर पुरातत्व विभागाचे लक्ष नाही, असा आरोप निवेदनातून केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सदर तोफेची किंमत लाखो रुपये मानली जात असली तरी, या तोफेच्या चोरीमुळे समस्त जिजाऊ भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. या तोफचोरीचा तपास ताबडतोब लावावा, अशी मागणी केली आहे. राजवाड्याच्या देखरेखीची जबाबदारी असलेले अभिरक्षक एम.वाय.कामठे हे सिंदखेडराजा येथे कधीच येत नसल्याने आणि तोफेची किंमत ४५00 दाखवून समस्त जिजाऊ भक्तांच्या भावना दुखविल्या आहेत त्यामुळे कामठे यांना त्वरित निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अँड.नाझेर काझी, माजी खासदार सुखदेव काळे, तालुकाध्यक्ष शिवाजी राजे जाधव, भाजपाचे रावसाहेब देशपांडे, शिवसेना तालुका प्रमुख सतीश काळे, शिवसेना नेते रवींद्र पाटील, जय जवान जय किसान संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जून गवई, व्यापारी संघटना यांनी केली आहे.
तोफेचे ‘अवमूल्यन’, सर्वपक्षीय निषेध
By admin | Published: December 25, 2014 1:47 AM