- अनिल गवई
खामगाव: शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर झालेली असली तरी प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे या कामांना गती मिळत नसल्याचे चित्र असून सत्ताधारी हतबल झालेले दिसत आहेत. तर विषय समितींचे सभापती बदलल्याने या कामात आणखी अडसर निर्माण झाला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मानाचे स्थान असलेल्या खामगाव पालिकेत अनेक वर्षांनंतर भाजप(परिवर्तना)ची सत्ता स्थापन झाली. कृषिमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांचे होमटाऊन व स्वत: भाऊसाहेबच पालकमंत्री असल्याने विकासाची अभूतपूर्व संधी चालून आली. भाऊसाहेबांनी निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही वेळोवेळी देवून भरमसाठ निधी उपलब्धही करुन दिला. परिणामी कोट्यवधी रुपयांची विकासकामे शहरात मंजूर झालेली आहेत. परंतु या कामांना प्रत्यक्षात सुरुवात अद्यापही झाली नाही. पालिकेत सत्ता स्थापन होवून वर्षपूर्ती झाली तरी अद्याप कोणतेही विशेष बदल शहरवासीयांना जाणवत नाहीत. याला प्रमुख कारण म्हणजे प्रशासकीय स्तरावरील उदासिनता व असहकार्य असल्याचे सत्ताधारी नगरसेवकच बोलताना दिसून येतात. प्रशासनाकडून कामांना गती दिली जात नसल्याने सत्ताधारी हतबल झाले आहेत.
दरम्यान, विविध समाजघटकांना तसेच सर्व समावेशक लाभ देण्यासाठी सत्तेच्या वाटाघाटीचा (विकेंद्रीकरण) ‘पांडुरंग’ फॉर्म्युलाही अस्तित्वात आला. त्यानुसार ‘टर्म’वाईज नगरसेवकांना संधी दिली जात आहे. मात्र, ही बदलाची नांदी आता पक्षश्रेष्ठींसह नवोदितांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येते. पालिकेच्या विविध विषय समितीची निवडणूक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पार पडली. या निवडणुकीनंतर नवीन विषय सभापतींसमोर ‘तांत्रिक’ अडचण निर्माण झाली आहे. विषय सभापतींचा ‘नवखे’पणा मुख्य अडसर ठरत असल्याने ‘परिवर्तना’च्या विकासाची गाडी रुळावर येण्यासाठी बराच अवधी लागेल, अशी चर्चा पालिका वर्तुळात आता रंगत आहे.
खामगाव पालिकेतील विषय समिती निवडणुकीत आरोग्य समिती सभापतीपदी हिरालाल बोर्डे यांची तर बांधकाम समिती सभापतीपदी सौ. शोभा रोहणकार, पाणी पुरवठा सभापती म्हणून ओमप्रकाश शर्मा, शिक्षण समिती सभापती सौ. भाग्यश्री मानकर, महिला व बालकल्याण सभापती सौ. जाकीयाबानो शे. अनिस यांची आणि उपसभापतीपदी सौ. दुर्गा हट्टेल यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवड झालेले बहुतांश सभापती पालिकेत नगरसेवक म्हणून पहिल्यादांच विजयी झाले आहेत. पालिकेतील प्रशासकीय कामकाजाच्या अनुभवाचा अभाव हा मुख्य अडथळा नवीन विषय सभापतींच्या समोर आहे.
नगर पालिकेत पाणी पुरवठा सभापती ओमप्रकाश शर्मा यांच्यासोबतच आरोग्य सभापती हिरालाल बोर्डे यांनी कामकाजाला प्रत्यक्षपणे सुरूवात केली असली तरी, अद्यापपर्यंत त्यांना त्यांचा कामाचा तसेच कार्यक्षेत्राचा आवाका लक्षात आला नसल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे शिक्षण सभापती भाग्यश्री मानकर, महिला व बाल कल्याण सभापती जाकीया बानो, उपसभापती दुर्गा हट्टेल आणि बांधकाम सभापती शोभाताई रोहणकार आपल्या कामाची चुणूक दाखवू शकल्या नाहीत. उच्च शिक्षित म्हणून भाग्यश्री मानकर यांची शिक्षण सभापतीपदी वर्णी लावण्यात आली आहे. पालिकेच्या शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडविण्याची संधी भाग्यश्री मानकर यांच्यासमोर आहे. तसेच शोभाताई रोहणकार आणि जाकीया बानो यांनाही आगामी काळात आपल्या पदांना न्याय देण्यासाठी झटावे लागणार असल्याचे दिसून येते.
आमदार अॅड. आकाश फुंडकरांची शिष्टाई!
विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता आपण भासू देणार नसल्याची ग्वाही राज्याचे कृषी तथा फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी पालिकेतील सत्ताधाºयांना दिली आहे. शहरातील विकास कामे वेगाने मार्गी लावण्यासाठी आग्रह धरला आहे. मात्र, याकामी हवी तशी गती मिळत नसतानाच, पक्षातंर्गत कुरबुरींमुळे भाऊसाहेब नाराज असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर विकास कामांना गती देण्यासाठी खामगाव मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर स्वत: पालिकेत वेळ देत आहेत. आमदार आकाश फुंडकर यांनी शुक्रवारी पालिकेतील उपाध्यक्षांच्या दालनात नवनियुक्त विषय सभापतींसह भाजप पदाधिकाºयांची बैठक घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेत, परिवर्तनाच्या विकासाच्या गाडीला वेग देण्याचा प्रयत्न केला. तसेच अंतर्गत नाराजी दूर करत काही नगरसेवकांची कानउघाडणीही केल्याची माहिती आहे.