दुसरबीड : सिंदखेड राजा तालुक्यातील माेठी ग्रामपंचायत असलेल्या दुसरबीड येथे गत काही महिन्यांपासून कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्याने विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये कायमस्वरूपी ग्रामसेवक देण्याची मागणी हाेत आहे.
प्रशासकाच्या काळामध्ये या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आसाराम पोपटे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारून निलंबित करण्यात आले हाेते. त्यानंतर गायकवाड यांच्याकडे ग्रामपंचायतीचा प्रभार देण्यात आला, तर काही दिवस चौधरी यांनी ग्रामपंचायतचे कामकाज पाहिले. चाैधरी गैरहजर राहत असल्याने दानवे यांच्याकडे प्रभार देण्यात आलेला आहे. मात्र, ते आठवड्यातून काही दिवसच येत असल्याने विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांना कागदपत्रांसाठी भटकंती करावी लागत आहे. पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने गावांमधील विकासकामांना खीळ बसली असून, नालेसफाईसुद्धा झालेली नाही. गावातून गेलेल्या महामार्गावर ग्रामपंचायतीची जलवाहिनी फुटून नेहमी पाणीगळती होते. गत सहा महिन्यांपासून कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्याने ग्रामपंचायत कामकाजात अडचणी निर्माण झाल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन कायमस्वरूपी ग्रामसेवक देण्याची मागणी सरपंच ज्योती सांगळे यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांची कागदपत्रांसाठी भटकंती
दुसरबीड ग्रामपंचायतला कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्याने विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना विविध कागदपत्रांसाठी भटकंती करावी लागत आहे. पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना विविध दाखल्यांची गरज आहे, तसेच शैक्षणिक सत्र सुरू झाल्याने विद्यार्थी विविध दाखल्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. याकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी ग्रामसेवक देण्याची गरज आहे.