बुलढाणा: -स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मारेकऱ्यांनी दाखवलेली क्रूरता माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेची छायाचित्रे पाहून संपूर्ण महाराष्ट्र संतापला आहे. पोलिस आणि सरकारकडे या घटनेचे सर्व पुरावे असतानाही सरकार धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. या प्रकारामुळे महाराष्ट्राची प्रतिष्ठा कलंकित झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
या संदर्भात बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "फक्त धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याने सरकार निर्दोष ठरत नाही. त्यांना पदच्युत करण्याऐवजी राजीनामा मागण्याचा मार्ग सरकारने का अवलंबला, हा खरा प्रश्न आहे. पोलिसांकडे सुरुवातीपासून या घटनेचे फोटो, व्हिडीओ आणि अन्य पुरावे होते, म्हणजेच गृहमंत्रालय आणि सरकारकडेही ही माहिती होती. तरीही सरकार दोन महिने मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. यावरून स्पष्ट होते की, आरोपींना सरकारचा पाठिंबा होता आणि हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला."
संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या संघर्षाला जनतेचे आणि माध्यमांचे पाठबळ मिळाल्याने सत्य उजेडात आले. अन्यथा सरकार हे प्रकरण दडपण्यात यशस्वी झाले असते. आता सरकार स्वतःला वाचवण्यासाठी केवळ मुंडेंचा राजीनामा पुरेसा असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, हा प्रकार जनतेला स्वीकार्य नाही. सत्य उघडकीस आले असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पायउतार व्हावे, अशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची ठाम भूमिका आहे.