अनिल गवई
खामगाव : संपूर्ण देशात एकमेव खामगाव शहरात भक्तीभावाने साजरा केल्या जाणाºया शांती महोत्सवाची गुरूवारी सांगता झाली. गुरूवारी दुपारी १ वाजता मिरवणुकीला जलालपुरा येथून प्रारंभ झाला. मिरवणुकीद्वारे हजारो भाविकांनी मोठी देवीला श्रध्देचा निरोप दिला. विसर्जनापूर्वी मोठी देवीची शहराच्या विविध भागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
खामगाव शहरात यावर्षी कोजागिरी पौणिमेच्या दिवशी म्हणजेच ०९ आॅक्टोबर रोजी शांती महोत्सवाला सुरूवात झाली होती. शहरातील जगदंबा रोड भागात सार्वजनिक मोठी देवी जगदंबा नवरात्रोत्सव मंडळासोबतच विविध मंडळांनी मोठी देवीची प्राणप्रतिष्ठा केली होती. दरम्यान, दहा दिवसांच्या पूर्जा अर्चा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी शांती उत्सव साजरा करण्यात आला. मंगळवारी मोठी देवी जवळ होम हवन करण्यात आले. त्यानंतर गुरूवारी शांती महोत्सवाची सांगता झाली. दुपारी १ वाजताच्या दरम्यान, जलालपुरा भागातून मोठी देवीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. जगदंबा रोड, मेनरोड, गांधी चौक, अकोला बाजार, जनता बँक, परत जगदंबा रोड, भुसावळ चौक, मोठा पुल मार्गे दुपारी २:३० वाजता ही मिरवणूक सतीफैलात पोहोचली. याठिकाणी मोठी देवीची सामुहिक आरती करण्यात आली. काही वेळाच्या विसाव्यानंतर दुपारी सव्वोतीन वाजताच्या सुमारास मोठी देवीच्या मिरवणुकीला पुन्हा सुरूवात झाली. ठक्कर आॅईल मिल, शिवाजी नगर, मोठा पुल, सरकी लाईन, मेनरोड, फरशी, सराफा पोस्ट आॅफीस, राणा गेट जवळून पुरवार गल्ली, शिवाजी वेस, सत्यनारायण मंदीर, घाटपुरी नाका, छोटी देवी मंदीर, जगदंबा संस्थान मार्गे घाटपुरी नदीच्या पुलापर्यंत पोहचून तेथून बायपास मार्गे उशिरा रात्री जनुना तलाव येथे देवीचे विसर्जन करण्यात आले.
भाविकांची अलोट गर्दी!
ग्रामदैवत असलेल्या आई जगदंबेला (मोठी देवी) श्रध्देचा निरोप देण्यासाठी खामगाव आणि परिसरातील भाविकांची मोठी गर्दी जमली होती. दुपारी १ वाजता जलालपुºयात सामुहिक आरती करण्यात आली. त्यानंतर मोठी देवीची विसर्जन मिरवणूक सुरू झाली. यावेळी ठिकठिकाणी भाविकांना चहा, नास्ता आणि फराळाचे वितरण करण्यात आले. दुपारी २.३० वाजता सतीफैलात देवीच्या आरतीच्या वेळी भाविकांची अलोट गर्दी झाली होती.
सतीफैलात अनेकांच्या कडा पाणावल्या!
विसर्जन मिरवणूक दुपारी सती फैलात पोहोचली. त्यावेळी स्थानिक भाविकांच्यावतीने देवीच्या पहिल्या ठाण्यावर खणानारळाची ओटी भरण्यात आली. हा क्षण डोळ्यात साठवणाºया भाविकांच्या डोळ्यात अक्षरक्ष: अश्रृ तरळले होते. जगदंबा विसर्जन मिरवणुकीत शहरातील ५४ सार्वजनिक जगदंबा उत्सव मंडळाने सहभाग घेतला.
गांधी चौकात मिरवणुकीचे स्वागत!
शहरातील गांधी चौकात आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी मोठी देवीचे स्वागत केले. यावेळी वंदेमातरम मंडळाच्यावतीने फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.