नवीन मोदे। लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव बढे: येथील ग्रामपंचायत बरखास्त करून प्रशासक नेमण्याचा ठराव १५ ऑगस्ट रोजी आमसभेत पारित करण्यात आला होता. त्या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी १८ सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा यांच्याकडे संबंधि तांनी अर्ज केला होता. त्यानुषंगाने उपमुख्याधिकारी बुलडाणा यांनी गटविकास अधिकारी मोताळा यांना चौकशी करून कार्यपू र्ती अहवाल पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे धामणगाव बढेची ग्रामपंचायत बरखास्तीच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे.ग्रामपंचायत धामणगाव बढे येथे १५ ऑगस्ट रोजी आमसभेत विकास कामे रखडली, करवसुली होत नाही, लोकांना पायाभूत सुविधा मिळत नाही, शासकीय योजनांची अंमलबजावणी होत नाही, ग्रामपंचायतच्या मालमत्तेचा गैरवापर, सदस्यांची उडवाउडवीची उत्तरे यामुळे सदरहू ग्रामपंचायत कार्यकारिणी बरखास्त करण्याचा ठराव घेण्यात आला. त्यामुळे असा ठराव घेणे योग्य होणार नाही, असा शेरा तत्कालीन ग्रामविकास अधिकारी शिवदे यांनी मारला आहे. बरखास्तीचा ठराव आमसभेत पारित झालेला असताना संबंधितांनी असा शेरा मारणे आमसभेच्या मुख्य उद्देशाला व लोकशाही मूल्यांना हरताळ फासण्यासारखे आहे. सदर ठराव आमसभेत देवानंद जाधव यांनी मांडला होता, तर अँड.शे.वसिम कुरेशी यांनी ठरावास अनुमोदन दिले होते. ठरावाच्या एक महिन्यानंतरसुद्धा अंमलबजावणी होत नसल्यामुळे संबंधितांनी मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा यांच्याकडे दाद मागितली. त्यानुषंगाने चौकशीचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी मोताळा यांना दिले आहे. तत्पूर्वी अँड.वसिम कुरेशी, देवानंद जाधव व इतर यांनी ग्रामपंचायतच्या ठरावासह तीस विविध मुद्यांसह ग्रामपंचायत बरखास्त करण्याची मागणी मुख्याधिकारी बुलडाणा यांच्याकडे केलेली आहे.
संबंधित प्रकरणात विस्तार अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करण्यात येत आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल.- संजय पाटील, गटविकास अधिकारी, मोताळा.