मेहकर : एसटी प्रवर्गाचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी साेनाटी येथे सकल धनगर समाजाच्या वतीने रास्ता राेकाे आंदोलन करण्यात आले, तसेच यशवंत सेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुख राजू बोरकर टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले. जिल्हाधिकारी जाेपर्यंत चर्चा करणार नाही ताेपर्यंत खाली उतरणार नाही, असा इशारा त्यांनी दिल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. मेहकरचे उपविभागीय अधिकारी दिनेश गीते, तहसीलदार नीलेश मडके, मेहकर ठाणेदार राजेश शिंगटे, डोणगावचे ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्यासह पोलिसांचा बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे.
धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदाेलने सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मेहकर तालुक्यातील साेनाटी येथे धनगर समाजाच्या वतीने रास्ता राेकाे आंदाेलन करण्यात आले. या आंदाेलनामुळे रिसोडवरून मेहकरकडे येणारी संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. मेहकरकडून रिसोडकडे जाणारी वाहतूकही ठप्प झाली हाेती. यशवंत सेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुख राजू बोरकर हे टाॅवरवर चढून आंदोलन करीत आहेत.आंदाेलनामुळे वाहतूक वळविली -पोलिसांनी रिसाेड ते मेहकर मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली आहे. मेहकरकडून रिसाेडकडे जाणारी वाहतूकही वळवण्यात आली आहे. तसेच बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ॲडिशनल कलेक्टर सुनील विंचनकर हे टाॅवरवर चढलेल्या राजू बोरकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी येणार आहेत. जिल्हाधिकारी हे आंदाेलकांशी जाेपर्यंत चर्चा करीत नाहीत ताेपर्यंत आंदाेलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदाेलकांनी दिला आहे. या आंदाेलनामुळे भावबीजेसाठी जात असलेल्या प्रवाशांना माेठा फटका बसला.