लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : गेल्या सत्तर वर्षापासून धनगर समाजाची एस.टी. आरक्षणाची मागणी प्रलंबित आहे. विद्यमान सरकारने सत्तेत येण्यापुर्वी समाजाला दिलेले आश्वासन पाळावे व लोकसभा निवडणुकीपुर्वी आरक्षण लागु करावे, असे प्रतिपादन खासदार पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांनी मलकापूर येथे आयोजित बैठकीत शुक्रवारी केले.स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला संबोधित करताना; राज्यसभा खासदार डॉ.महात्मे म्हणाले की, गेल्या निवडणुकीपुर्वी भाजपाने धनगर समाजाला आश्वासन दिले होते. एस.टी. आरक्षणासाठीची शिफारस केंद्राकडे करून समाजाची गेल्या सत्तर वर्षापासून प्रलंबित मागणी पूर्ण करू व धनगर आरक्षण लागू करू, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु चार वर्षे उलटूनसुध्दा अद्यापपर्यंत मागणी पूर्ण झाली नाही. मराठा आरक्षण, सवर्ण आरक्षण शासनाने दिले. या निर्णयाचे स्वागतच करतो; परंतु धनगर समाज सुध्दा आरक्षणाची वाट पाहत आहे. भाजपा सरकारबाबत धनगर समाज आशावादी असून, शासनाने विलंब न करता आरक्षण लागू करावे, ही आमची मागणी आहे. त्याकरीता २० जानेवारी रोजी वाशिम येथे सकाळी ११ वाजता धनगर आक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रभरातून या आंदोलनात समाज बांधव तथा सर्व पक्षीय नेते व पदाधिकारी व विविध संघटना सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील समाजबांधवांनी या आंदोलनात सहभागी व्हावे व सरकारला धनगर समाजाचा आक्रोश कळवावा. यातून सरकारला शासनाला गर्भित इशारा द्यावा, असे आवाहन यावेळी खासदार डॉ.विकास महात्मे यांनी केले.यावेळी धनगर समाज संघर्ष समितीचे राज्य सचिव हरीश खुने, धनविजय सारकर, जिल्हा संयोजक मधुकर फासे, धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष मनोहर खाळपे, तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे, विनोद सावळे, चंद्रकांत कवळे, रामचंद्र बोरसे, अॅड.कैलास बोरसे, रामेश्वर बाजोडे, अशोकराव हेले, विनय काळे, निंबाजी बाजोडे, शिवराज सुरळकर, विश्वनाथ वसतकार, संभाजी सहावे, विनायक बोरसे, योगेश पाचपोळ, रमेश बोरसे, निलेश सोनोने, विनायक सपकाळ, गजानन कवळे, गजानन वाघ, प्रभाकर वाघ, अनिल पाचपोळ, राजु नेमाडे, शांताराम पाचपोळ, गजानन बोरसे, यांच्यासह मलकापूर तालुक्यातील धनगर समाज बांधवाची यावेळी उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)
लोकसभा निवडणुकीपुर्वी धनगर आरक्षण लागू करावे : विकास महात्मे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 5:11 PM