अमडापूर : धोत्रा भणगोजीत एका शेतकऱ्याच्या शेतातील ४० क्विंटल तुरीची सुडी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्याचे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
धोत्रा भणगोजी येथील रामेश्वर काळे यांची गट नं. ४५ मध्ये १० एकरातील तुरीची सुडी अज्ञात आरोपींनी जाळली असल्याचा प्रकार सोमवारी रात्री समोर आला आहे. रामेश्वर काळे यांनी वर्षभराचे पीक नियोजन केले. अनेक संकटे पार करीत १० एकरात तूर बहरली. मात्र होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी रात्रीच तुरीची सुडी अज्ञाताने पेटवून दिल्याने त्यांचे जवळपास ३ लाखांचे नुकसान झाले आहे. अंशत: लॉकडाऊनमुळे शेतात मजूर कामाला येत नाहीत. त्यामुळे माल काढता येत नाही. शेतमाल काढलाच तर बाजारात चांगल्या भावात विक्री होण्याची हमी नाही. यामुळे शेतकरी हा शेतमाल शेतातच सोडून देत आहेत. तत्पूर्वी अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशात रामेश्वर काळे यांची तुरीची सुडी अज्ञाताने जाळल्याची तक्रार अमडापूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.