दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील मृतकांची संख्या ३९९ झाली आहे. मृत्यू झालेल्यांचे डेथ ऑडिट करण्यासाठी जिल्ह्यात समिती गठीत करण्यात आली असून, ही समिती नियमित स्वरूपात मृत्यू पावलेल्यांचे डेथ ऑडिट करत असते. या समितीने मधल्या काळात गेलेल्या डेथ ऑडिटनुसार बुलडाणा जिल्ह्यात मधुमेहामुळे ३५ टक्के कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ४२ टक्के व्यक्तींचा मृत्यू हा हायपरटेन्शन अर्थात उच्च रक्तदाबाच्या विकारामुळे झाल्याचे समोर येत आहे. उर्वरित २३ टक्क्यांमध्ये फुप्फुसाचे आजार हृदयरोग, किडनी, लिव्हरच्या आजारामुळे मृत्यू झाला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, दुर्धर आजार असलेल्या व कोरोना झालेल्या रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण हे अधिक असल्याने, दुर्धर आजार असणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज डॉक्टर व्यक्त करत आहे. बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत, बाधितांचे मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे एकंदरीत आकडेवारीवरून स्पष्ट होते.
--अति जोखमीच्या व्यक्तींनी काय करावे?--
अति जोखमीच्या व्यक्तींनी गर्दीमध्ये जाणे टाळावे. अत्यंत आवश्यक असले, तरच बाहेर पडावे. डॉक्टरांचा नियमित सल्ला घ्यावा. आपले आरोग्य कसे सुदृढ राहील, यास प्राधान्य द्यावे. आनंदी राहून सकारात्मक विचार करावेत, तसेच घरात वयोवृद्ध तथा व्याधीग्रस्त व्यक्ती राहत असल्यास तरुण वर्गाने त्यांच्यापासून दूर राहावे. शारीरिक अंतर, मास्क वापरणे आणि नियमित हात धुण्याला प्राधान्य देत, दक्षता बाळगावी.