लोकमत न्यूज नेटवर्कधाड : बुलडाणा तालुक्यातील धाडसह परिसरातील गावांमधून शेकडो नागरीकांना डायरीयाची लागण झाली. ग्रामीण रूग्णालयात एका खाटेवर दोन दोन रूग्णांना झोपवून सलाईन देण्यात आले. साधारणपणे पिण्याचे पाण्याचे योग्यरित्या शुध्दीकरण न झाल्याने मोठ्या प्रमाणात डायरीयाची साथ सुरू झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. बोरखेड, धाड, बोराडे नगर, गजानन नगर व इतर गावातून डायरीयाचे लागण झालेले अनेकजण धाडच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल झाले.साधारणपणे कालच ४०० च्या वर रूग्णांनी ग्रामीण रूग्णालयातून उपचार घेतले होते. मात्र सकाळपासून परत रूग्णांची सारखी रीघ दवाखान्यात लागली होती. आज याठिकाणी सकाळी १० वा. सुमारास ग्रामीण रूग्णालयात तहसीलदार सुरेश बगळे यांनी भेट देवून रूग्णांना विचारपूस करून येथील डॉक्टरांकडून माहिती घेवून, वरिष्ठांना ग्रामीण रूग्णालयाची माहिती देवून या ठिकाणी तात्काळ आणखी आरोग्य पथक पाठवण्याची मागणी केली. तर दुपारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी ग्रामीण रूग्णालय धाड येथे भेट देवून पाहणी करत आरोग्य पथक ग्रामीण रूग्णालयात तैनात केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.सय्यद अफसर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना माहिती दिली व गावातील ठिकठिकाणचे पाईपलाईन लिकीजेसची माहिती ग्रा.पं. प्रशासनास देऊन उपाययोजनांची सुचना केली. आज सायंकाळपर्यंत साधारण ३०० च्या वर रूग्णांवर ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. तर प्रभावीत क्षेत्रातून प्रा.आ. केंद्राचे पथक घरोघरी सर्वेक्षणाचे कामाास लागले. यापूर्वीही ग्रामस्थ डायरियाने प्रभावितगत साधारण दोन-तीन वर्षापुर्वीही धाडला मोठ्या प्रमाणात डायरीयाची लागण झाली होती. त्यावेळी १५०० च्यावर नागरीक प्रभावीत झाले होते. जुनाट पाईप लाईन लिकीजेस व जुनाट व्हॉल्व लिकीजेसमुळे घाण पाईपलाईनव्दारे पिण्यात येते. परिणामी साथ सुरू होते. येथील ग्रामीण रूग्णालयात मागील काही वर्षापासून वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी तीन पदे रिक्त आहे. केवळ आयुष विभाग आयुर्वेदीक डॉक्टरांचे भरवश्यावर ग्रामीण रूग्णालय सुरू आहे. अगदी आजही रात्रपाळीत डॉक्टर हजर राहत नाहीत परिणामी तात्काळ रूग्णसेवा येथे मिळत नाही. जबाबदार वैद्यकीय अधिकारी नसल्याने ग्रामीण रूग्णालयाचा कारभार रामभरोसे आजही डायरीयाची लागण सुरू असताना येथे जबाबदार अधिकारी यांनी साधी भेट दिली नाही.प्रा.आ.केंद्राचे पथकाने शेवटी ग्रामीण रूग्णालयात आपले कर्मचारी पाठवून आयुष विभागाचे डॉक्टरांना मदत केली. जिल्हा शल्य चिकित्सकांना या गंभीर घटनेची माहिती पुर्वीच डॉक्टरांनी दिली. मात्र अद्याप पर्यंत त्यांचेकडून कुठलीच कार्यवाही नाही वा आरोग्य पथक पाठवण्यात आले नाही.
धाड येथे डायरियाची साथ; आरोग्य पथक दाखल
By admin | Published: June 29, 2017 12:27 AM