खामगाव : राज्यातील सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कथनी आणि करणीत फरक आहे. विरोधी पक्षात असताना विदर्भ राज्याची मागणी करणाºया भाजपकडून आता या मागणीला हुलकावणी दिल्या जात आहे. त्यामुळेच विदर्भ राज्याच्या निर्मितीला विलंब होत आहे. महाराष्ट्र हे दिवाळखोरीत निघालेले राज्य असून महाराष्ट्राला पोसण्यासाठीच विदर्भाला बळीचा बकरा बनविण्यात येत असल्याचे माजी आमदार अॅड वामनराव चटप यांनी येथे स्पष्ट केले. विदर्भ राज्य आंदोलन समितीने पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भाची हाक दिली आहे. येत्या ४ जुलै रोजी नागपूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला विदर्भ राज्यासाठी सकारात्मक असलेल्या विविध राजकीय पक्षासह सामाजिक संघटनांचाही पाठींबा मिळत असल्याचे शेतकरी नेते तथा माजी आमदार वामनराव चटप यांनी येथे सांगितले. खामगाव शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी चटप म्हणाले की, सद्या केंद्रात आणि राज्यातील भाजपच्या नेतृत्वातील सरकार हे अतिशय महत्वाकांक्षी सरकार आहे. स्वत:च्या मित्रपक्षासह इतरांनाही गिळंकृत करण्याची त्यांची मनिषा आहे. याच भावनेतून शिवसेनेलाही भाजपकडून कोंडीत पकडण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले जाताहेत. विदर्भ राज्याच्या बाबतीतही भाजपची भूमिका साफ नाही. ‘ओठात एक आणि पोटात दुसरे’ हाच प्रत्यय भाजप सरकारच्या कारकिर्दीत येत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांसोबतच शेतकरीही भरडल्या जात आहे.
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरात घेण्याचा शासनाचा प्रयत्न म्हणजे विदर्भ राज्य मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन निष्फळ ठरविण्याचा, या आंदोलनातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न होय, असा सनसणाटी आरोपही चटप यांनी यावेळी केला. विदर्भाचा वाढता अनुशेष भरून काढण्यात हे सरकार अपयशी ठरले असून विदर्भातील कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी विदर्भ राज्य निर्मितीसाठी ४ जुलैला नागपूर बंदची हाक दिली आहे. त्यादृष्टीकोनातून जिल्हा निहाय पदाधिकाºयांच्या जबाबदारी निश्चित करण्यात आल्या असल्याचेही चटप यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला महिला आघाडीच्या पश्चिम विदर्भ प्रमुख रंजना मामर्डे, कैलास फाटे, रमेशसिंह चव्हाण, राजू नाकाडे, डिंगाबर चिंचोले, अमित तायडे, जिल्हाध्यक्ष अॅड. सुरेश वानखडे, तेजराव मुंडे, दामोदर शर्मा यांची उपस्थिती होती.