मेहकर : येथील पुरातन वास्तू म्हणुन राज्यात प्रसिध्द असलेला कंचनीचा महालाच्या आजुबाजुला अतिक्रमण करण्यात आलेले आहे. या वास्तुच्या बाजुला असलेली टेकडी जेसीबीने खोदुन त्या ठिकाणचा मुरुम पालखी मार्ग मेहकर ते खामगाव रोडवर नेण्यात येत असल्याने या वास्तुला धोका निर्माण झालेला आहे.मेहकर शहराच्या उत्तरेला असलेल्या वास्तूला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. कविवर्य ना. घ. देशपांडे यांनी कंचनीवर दिर्घकाव्यसुद्धा लिहलेले आहे. ही वास्तू मेहकरचे नावलौकिक वाढवणारी आहे. मेहकर-खामगाव पालखी मार्गाचे काम सध्य सुरू आहे. याकरिता कंचनीच्या महालाच्या लगतचा मुरूमाचे खोदकाम करण्यात येत आहे. आधीच शेवटच्या घटका मोजणाऱ्या महालाचे अस्तित्व धोक्यात आल्याने या प्रकारामुळे महालाला धोका निर्माण झाला आहे. अशा पुरातन वास्तू शहराच्या नावलौकिक वाढवणाºया आहेत. तरी त्यांचे संवर्धन करणे शासनाची जबाबदारी असताना ठेकेदाराला मुरूम काढण्याची परवानगी कोणी दिली हे महत्त्वाचे आहे. यामुळे संबंधित ठेकेदार, पुरातत्व विभागाचे अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन संबंधित महसुल अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन या प्रकरणी दोषीवर कारवाई करावी, अन्यथा रा.स.प.च्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुरेशराव सोनुने, तालुका अध्यक्ष सुरेशराव औदगे, युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद आसोले, शहर अध्यक्ष गजानन भुतेकर, गजानन राऊत या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कंचनी महालाच्या परिसरात खोदकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 3:04 PM